कराड : येथील कृष्णा पुलावरून एका तरुणीने कृष्णा नदीपात्रात उडी मारल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांची आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की संबंधित तरुणी एका खासगी रुग्णालयात नोकरी करते. तिचे नुकतेच लग्न ठरले होते. दोन दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडाही झाला होता. मात्र, लग्नापूर्वीच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संबंधित तरुणी दुचाकीवरून कृष्णा पुलावर आली. तिने गाडी उभी केली आणि भ्रमणध्वनीवरून कोणाशी तरी ती बोलली. त्यानंतर तिने थेट नदीत उडी मारली. हे पाहून पुलावरील लोकांनी आरडाओरडा केला. काही वेळातच पुलावर मोठी गर्दी जमा झाली. नदीपात्रात बेपत्ता झालेल्या या तरुणीचा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान व मच्छीमार शोध घेत आहेत.