रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या पाच जणांना कर्जत वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ३९ किलो रान डुकराचे मांस आणि अवयव जप्त करण्यात आले आहेत.  

कर्जत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना शिकारीबाबतची माहिती मिळाली होती. त्यानूसार त्यांनी कर्जत पूर्व परिमंडळ हुमगाव, मौजे साळोखवाडी येथील रहिवासी मारुती पवार यांच्या घरासमोर असलेल्या बकऱ्यांच्या बेड्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी आरोपी दशरथ बाळू वाघमारे, शरद रघुनाथ वाघमारे, सोमनाथ पप्पू पवार, साळोखवाडी, दिपक लहानू पवार (सर्व आरोपी राहणार मौजे साळोखवाडी) यांनी रानडुकराची शिकार करून त्याच्या अवयवाचे व मांसाच्या विक्रीसाठी कोयत्याने तुकडे करीत असताना आढळून आले. त्यांनी वनकर्मचाऱ्यांना पाहून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र वनकर्मचाऱ्यांनी या गुन्ह्यातील आरोपी दशरथ बाळू वाघमारे यांना ताब्यात घेतले. या आरोपीने सांगितलेल्या जबानीवरुन रविंद्र मुका वाघमारे, वय वर्ष ५२, रा.डोनेवाडी ता.कर्जत यास अटक केली. त्यानंतर शरद रघुनाथ वाघमारे, रा.साळोखवाडी व  दिपक लहानू पवार, रा.साळोखवाडी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या संपूर्ण कटात सहभागी असल्याने  गजानन मारुती पवार, रा.डोणेवाडी ता.कर्जत यालाही अटक केली.

गुन्ह्यातील आरोपींना प्रथम वर्ग न्यायालय, कर्जत येथे हजर करण्यात आले.  न्यायालयाने या प्रकरणी एकूण पाच आरोपींना सहा  दिवसाची वन कोठडी  सुनावली आहे. या प्रकरणाचा कर्जत (पूर्व) वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण हे अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे व पनवेल सहाय्यक वनसंरक्षक एस.एन.वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.