Kashinath Chaudhari Palghar Sadhu Murder Accused : पालघरमध्ये १६ एप्रिल २०२० रोजी जमावाने दोन साधूंची हत्या केली होती. या घटनेमुळे तेव्हा राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. या हत्येनंतर भारतीय जनता पार्टीने तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारवर हिंदूविरोधी असल्याची टीका केली. प्रामुख्याने तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, याच प्रकरणात भाजपाने ज्या व्यक्तीवर गंभीर आरोप केले होते त्या काशिनाथ चौधरी यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, यावरून विरोधकांनी भाजपाला धारेवर धरलं.

विरोधकांच्या टीकेनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिली. त्यानंतर आज (१८ नोव्हेंबर) काशिनाथ चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतःची बाजू मांडली.

काशिनाथ चौधरी पहिल्यांदाच माध्यमांसमोर

काशिनाथ चौधरी म्हणाले, “माझ्यावर आरोप करून माझं व माझ्या कुटुंबाचं, माझ्या मुलांचं जगणं मुश्कील करून टाकलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर अत्यंत घाणेरड्या कमेंट्स येत आहेत. मी या टीकेला व्यक्तिगत स्तरावर तोंड दिलं असतं, मात्र माझ्या कुटुंबाचं जगणं अवघड करून टाकलं आहे. मी अत्यंत संघर्षातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. मी प्रामाणिकपणे काम करतोय. या राजकारणासाठी माझं राजकीय करीअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल मात्र, माझ्या मुलांना यात भरडू नका. या सगळ्यात माझी लहान मुलं भरडली जात आहेत. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो. हे खूप संवेदनशील प्रकरण आहे.

मी मदत करायला गेलो होतो : काशिनाथ चौधरी

“मी त्या महंत साधूंना, आमच्या दैवताला वाचवायला गेलो होतो. मी पोलिसांच्या सांगण्यावरून त्यांच्या मदतीसाठी तिथे गेलो होतो. अडचणीच्या काळात असं वाचवायला जाणं गुन्हा आहे का? या मदतीसाठी माझ्यावर आरोप होत आहेत. माझं कुटुंब यात भरडलं जात आहे. मी सर्वांना विनंती करतो, माझ्या कुटुंबाला यात ओढू नका. मला व माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास होतोय. कृपया या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नका.”

“माझ्यावर कोणाचाही दबाव नाही”

दरम्यान, यावेळी चौधरी यांना विचारण्यात आलं की तुमच्यावर भाजपात प्रवेश करण्याचा दबाव होता का? यावर ते म्हणाले, “माझ्यावर कुठलाही दबाव नाही. माझं स्थानिक भाजपा नेत्यांशी बोलणं झालं होतं. त्यांनी सविस्तर चर्चा करून आणि त्या प्रकरणाची माहिती घेऊन मला पक्षात घेण्याचा निर्णय घेतला होता.”