सावंतवाडी : पुणे येथे पार पडलेल्या सोमेश्वर फाउंडेशन आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दुसऱ्या महाराष्ट्र वरिष्ठ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्गची कॅरमपटू केशर निर्गुण ही महिला गटाची विजेती ठरली आहे. सिंधुदुर्गच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.सावंतवाडीची वंडर गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशरने याआधी कनिष्ठ गटाचे दोन वेळा राज्य अजिंक्यपद पटकावले आहे. तसेच, २०२२ मध्ये राज्यस्तरीय महिला वरिष्ठ गट निवड चाचणीचे विजेतेपदही तिने मिळवले होते.

२०२४ मध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या ‘रॅपिडो सुपर सिक्स’ स्पर्धेतही तिने महिला गटाचे जेतेपद जिंकले होते. मात्र, राज्य मानांकन स्पर्धेतील अंतिम फेरीत तिला अनेकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.या स्पर्धेत केशरने तिचा हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना रत्नागिरीच्या आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या आकांक्षा कदम हिच्याशी होता. चुरशीच्या तीन गेमपर्यंत चाललेल्या या सामन्यात केशरने शेवटच्या दोन बोर्डमध्ये आक्रमक खेळ करत आकांक्षावर विजय मिळवला. या विजयामुळे तिचा आत्मविश्वास दुणावला. त्यानंतर तिने उपांत्य फेरीत मुंबईच्या सोनाली कुमारीचा आणि अंतिम फेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरचा सरळ सेटमध्ये पराभव करत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतःच्या नावावर पहिले वरिष्ठ राज्य मानांकन विजेतेपद मिळवले.

केशरच्या या दिमाखदार कामगिरीमुळे तिच्या कुटुंबासह संपूर्ण जिल्ह्यातील कॅरम परिवारात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. पुणे येथील या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री. भारत देसडला, श्री. सनी निम्हण, उपाध्यक्ष श्री. धनंजय साठे, आणि मानद सचिव श्री. अरुण केदार उपस्थित होते.