शेतकरी आत्महत्या होणार नाहीत याची हमी द्या!

सात-बारा कोरा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत याची विरोधक हमी देत असतील तर आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे उत्तर राज्याचे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टिकेला दिले.
अलिकडेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मराठवाडय़ातील दुष्काळी भागाचा दौरा करताना शासनाची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलीच नसल्याचा आरोप केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न उचलून धरत सात-बारा कोरा करण्यास राज्य सरकार तयार नसल्याबद्दल टीका केली आहे. गुरूवारी मुक्ताईनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत खडसे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खरोखरच चिंतेचा विषय असला तरी सातबारा कोरा करणे किंवा संपूर्ण कर्जमाफी हे त्यावर पर्याय होऊ शकत नाही. हा अनुभव याआधीही आला असल्याचे खडसे यांनी निदर्शनास आणून दिले. राज्यात तूर्तास दारूबंदी शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठरवून दिलेल्या अटी व शर्तीनुसार गावांनी मतदानाव्दारे दारूबंदीची मागणी केल्यास त्या त्या गावात दारूबंदी करता येते. चंद्रपूर, गडचिरोली यांसारख्या जिल्ह्य़ांमध्ये दारूबंदी करण्यात आली असली तरी तेथील अनेक खाण कामगारांनी दारूबंदी उठविण्याची मागणी केल्याचेही खडसे यांनी नमूद केले.