जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीचे खंडोबा मंदिर व गड कोटाला पुरातत्त्व खात्याने राज्यस्तरीय संरक्षित स्मारकाचा दर्जा घोषित केला आहे. याबाबतचे पत्र श्री मार्तंड देवस्थानाला पाठविण्यात आले आहे.

श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गड हा प्राचीन असून, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षभरात खंडोबा देवाच्या सात ते आठ मोठ्या यात्रा भरतात. या वेळी लाखो भाविक यात्रेसाठी येतात, तर दररोज कुलधर्म, कुलाचार करण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी असते. वर्षभरात सुमारे ५० लाखांंहून अधिक भाविक देवधर्म करण्यासाठी व पर्यटनासाठी येतात. राज्य सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला असून, यासाठी ३४९ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.

त्यांपैकी सुमारे १०९ कोटी रुपयांची विकासकामे पहिल्या टप्प्यात सुरू आहेत. जेजुरीचे खंडोबा मंदिर व गडकोट हे राज्य संरक्षित स्मारक यापूर्वीच घोषित करण्यात आले असून, याबाबतचे पत्र पुणे पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहने यांनी दिले आहे. त्यामुळे आता खंडोबा गडावर विकासकामे करण्यासाठी शासनाची अधिक मदत होणार असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्वस्त मंडळाने ही माहिती पालखी सोहळा खांदेकरी, मानकरी, नित्य सेवेकरी, पुजारी सेवेकरी आणि ग्रामस्थांना दिली. या वेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, अनिल सौंडदे, ॲड. विश्वास पानसे, माजी विश्वस्त नितीन राऊत, संदीप जगताप, व्यवस्थापक आशिष बाठे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, पंडित हरपळे, बापू सातभाई, माधव बारभाई, सचिन मोरे, भाग्येश बारभाई आदी उपस्थित होते.