राज्याचा खरीप हंगाम म्हटले की, खरीप हंगामातील पीक वैविध्यता समोर यायची. म्हणजे काय तर राज्याच्या सर्व भागात मूग, मटकी, चवळी, उडीद, सारखी कडधान्ये. खरीप बाजरी, खरीप ज्वारी, मका, ऊस त्याचबरोबर तेलबियांमध्ये भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल कारळ, तीळ, एरंडी अशा अशा विविध पिकांची नावे समोर यायची.

अगदी लहान शेतकऱ्याला शक्य नाही झालं तर किमान बांधाच्या कडेला, शेताच्या कडेला तरी तो तीळ, कारळ सारख्या तेलबियाची लागवड करायचा. अगदी घरी खाण्यापुरती तरी चवळी, मूग, मटकी सारखे कडधान्य घेतली जायची. मात्र, जागतिकीकरणानंतर म्हणजे साधारण शेती क्षेत्रामध्ये २००० नंतर प्रचंड वेगाने बदल व्हायला लागले आणि पीक पद्धतीतही बदल व्हायला लागले. बाजारात ज्याला मागणी आहे, जागतिक बाजाराच्या दर आहे आणि जे अन्नधान्य पैसे मिळवून देते, त्याची लागवड करण्याचा कल वाढू लागला. त्यापूर्वी आपल्याला घरी जे खायला लागते, ते आपल्या शेतात पिकवण्याचा कल होता. आता मात्र बाजारात भाव आहे, ते पिकवायचं ते बाजारात विकायचं आणि आपल्याला जे लागतंय ते एक बाजारातून खरेदी करून आणायचं असा ट्रेंड सुरू झालेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्याच्या खरीप हंगामातील पीक वैविध्यता संपली आहे.

राज्यात खरीप हंगामातील लागवडीखालील क्षेत्र सरासरी दीडशे लाख हेक्टर आहे. या १५० लाख हेक्टरमध्ये सरासरी १४५ ते १५९ लाख टन लाख हेक्टरवर लागवड होत असते. चांगला पाऊस पडला तर कधी कधी दीडशे लाख हेक्टरचा आकडा ही ओलांडला आहे आणि कमी पाऊस झाला असताना १४० लाख हेक्टरवर पण पेरणी रोडावलेली आहे.

यंदा साधारण १४६ लाख लाख हेक्टरवर पेरणी गेली आहे आणि त्यापैकी जवळपास ३४ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. त्या खालोखाल २६ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. दहा टक्के क्षेत्रावर मका आणि दहा टक्के क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे तर ऊस लागवड १.७ लाख हेक्टरवर झाली आहेत. कडधान्यांचा विचार करता साधारण ८.५ टक्के क्षेत्रावर तूर, १.४ टक्के क्षेत्रावर मूग आणि २.६ टक्के क्षेत्रावर उडदाची लागवड झाली आहे. आता यामध्ये आपल्याला राजगिरा कोद्रा, कोडू, कुटकी, वरई, बार्ली, सावा, राळा या प्रकारची पौष्टिक तृणधान्ये पूर्णपणे संपलेली आहेत किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर मार्गावर असल्याचे दिसून येते.

२०२३ मध्ये आपण जागतिक मिलेट म्हणजेच जागतिक तृणधान्य वर्ष साजरे केले. त्या वर्षानिमित्त अनेक कोटी रुपये खर्च करून तृणधान्य लागवडीवर भर दिला गेला. पण प्रत्यक्षात मात्र त्याचा काही फायदा होताना दिसत नाही. बाजारात तृणधान्य आणि तृणधान्यावर प्रक्रिया करून तयार केलेल्या अन्नपदार्थाला आजही फारशी मागणी नाही, दर्जा नाही. त्यामुळे तृणधान्यांना फारसे चांगले दिवस राहिले नाहीत. अनेक तृणधान्ये नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर तीर, कारळ, सूर्यफूल याचे क्षेत्र सुद्धा पूर्णपणे सोयाबीन खाऊन टाकला आहे.

कापूस, ऊस, सोयाबीन ही महत्त्वाची पिके म्हणून समोर आली आहेत.

या पिकांमध्ये पूर्वी आंतरपिके घेतली जायची किंवा या पिकांच्या बांधावर किंवा त्याच्या चौफेर तेलबिया, कडधान्याची पेरणी केली जायची. पण आता या पिकांची काढणी, पेरणी काही काही प्रमाणात यंत्राद्वारे केली जात असल्यामुळे पेरणी काढणीत अडचण येते म्हणून पूर्ण शेतात, शिवारात एकच पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामुळे उत्पादन खर्च काही प्रमाणात कमी होत असला तरी पिकांची वैविध्य संपली आहे. याचा दुसरा परिणाम असा झाला आहे की, शेतकऱ्याच्या घरात सुद्धा अनधान्याची वैविध्यता संपली आहे. महत्त्वाचे अन्नधान्य सोडले तर त्यालाही बाजारातून डाळी, कडधान्ये, तेलबिया विकत आणाव्या लागतात. ही शेतीतील वैविध्यता संपल्याचीच लक्षण आहेत. यावर्षी हे अधिक प्रकर्षाने दिसून आले.

शेतीतील पीक वैविध्यता ही निसर्गाला पूरक होती. प्रामुख्याने सर्व पिकांमध्ये परागीभवनाची क्रिया पार पाडण्यासाठी मधमाशांची गरज असते. पिकांची वैविध्यता असल्याच्या काळात शेत शिवारात मधमाशा घोंगावताना दिसायच्या त्याच्यामुळे परागीभवन मोठ्या प्रमाणात होऊन पीक उत्पादनात वाढ होत असे. आता पिकांची वैविध्यता राहिली नाही. त्यामुळे फुलांचे प्रमाण शेत शिवारात कमी झाल्यामुळे मधमाशा संपल्या आणि माशांअभावी परागीभवन होईना. आणि परागीभवन अभावी उत्पादनात मोठी घट होताना दिसत आहे. त्यामुळे आता राजस्थान, मराठवाडा, विदर्भ या भागात परागीभवनासाठी मधमाशांच्या पेट्या भाड्याने घ्यायची वेळ आलेली आहे, ही पीक वैविध्यता नसल्याचा फटका आहे. दुसरे काही नाही.

बाजारात ज्याला मागणी आहे किंवा बाजारात विकून ज्याला चांगले पैसे येतात त्याच पिकाची, त्याच अन्नधान्याची लागवड करण्याचा ट्रेड वाढीस लागल्यामुळे ही अवस्था झाली आहे. याचा दुसरा अर्थ असा की ग्रामीण भागातील घराघरांत कडधान्य, तेलबिया असताना लहान, मोठे मनसोक्तपणे त्याचा आनंद घ्यायचे. आता ते राहिले नाही. ग्रामीण भागात सुद्धा बाजारातून कडधान्य, तेलबिया आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एकूणच ग्रामीण भागातल्या पोषण आहारावर किंवा लहान मोठ्यांच्या पोषणाचा प्रश्न हे गंभीरपणे समोर येण्याची शक्यता आहे.

कारण त्याच्या आहारात असलेली वैविध्यता ही लागवडीच्या वैविध्यतेबरोबर संपलेली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात काय खपतय ते आपण पिकवायचं ते विकायचं आणि बाजारातून आणून पोट भरायचं, या या विचाराला किंवा या समीकरणाचा पुन्हा नव्याने काही विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आणखी काही वर्षांनंतर खरीप हंगामातील पीक पद्धतीतील वैविध्यता जपण्यासाठी सरकारला, शेतकऱ्यांना, धोरणकर्ते आदींना विशेष प्रयत्न करावे लागतील.