माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी ( २३ एप्रिल ) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे विराट सभा होणार आहे. तसेच, दिवंगत माजी आमदार आर. ओ पाटील यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. आर. ओ पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी या सभेचं आयोजन केलं आहे.

यावरून शिवसेना ( शिंदे गट ) आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. “माझ्यावर संस्कार असल्याने उद्धव ठाकरेंचं स्वागत करत आहे. पण, साडेतीन वर्षांपूर्वी आर. ओ पाटील यांचं निधन झालं. ते पाचोरा मतदारसंघाचे १० वर्ष आमदार होते. मात्र, आर. ओ पाटील यांना कॅन्सरचं निदान झाल्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात असताना उद्धव ठाकरेंना आर. ओ पाटील आठवण काढत असल्याची सातत्याने माहिती दिली. परंतु, याची साधी दखलही ‘मातोश्री’वरून घेण्यात आली नाही.”

हेही वाचा : “अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता”, संजय राऊतांचं विधान; म्हणाले “काहीजण लायकी नसताना…”

शिवसेनेत बंड झाल्यानंतर तुमच्याविरोधात भगिनी वैशाली सुर्यवंशी उभे राहिल्याचं पाहायला मिळत आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर किशोर पाटलांनी म्हटलं, “ज्या कालपर्यंत सर्वांना शिव्या घालत होत्या की, माझ्या वडिलांच्या निधनानंतर साधी विचारपूस करण्यासाठी कोणीही आलं नाही. ती मुलगी जेव्हा ठाकरेंच्या पक्षात जाऊन कट्टर शिवसैनिक समजते. है माझं दुर्दैव आहे.”

हेही वाचा : नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? अजित पवारांनी थेटच सांगितलं; म्हणाले…

उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे पाचोऱ्यातील राजकीय वातावरण बदलेत? असं विचारल्यावर किशोर पाटलांनी सांगितलं, “ठाकरेंच्यात एवढी जादू असती, तर दीडशे पैकी ५६ जागा आल्या नसत्या. जर त्यांच्या सभेमुळेच सर्वजण आमदार झाले असते, तर उद्धव ठाकरेंनी २८८ मतदारसंघात सभा घेतल्या असत्या. महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरेंच्या भाषणाला त्रस्त झाली आहे. एखाद्या लहान मुलासारखं माझा बाप चोरल्याचं सांगतात. ज्याला बाप सांभाळता येत नाही, तो महाराष्ट्र काय सांभाळेल,” अशी टीका किशोर पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.