अहिल्यानगर: अकरावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर चाकू हल्ला करून तिच्या खुनाचा प्रयत्न करण्याची घटना आज, शनिवारी सकाळी शहरातील सावेडी उपनगरात घडली. या घटनेतील आरोपी यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात अटक होता, काही दिवसांपूर्वी तो जामिनावर सुटला. त्यानंतर त्याने हे कृत्य केल्याची माहिती तोफखाना पोलिसांकडून मिळाली. घटनेमागील कारण सायंकाळपर्यंत स्पष्ट झालेले नव्हते.
मुलीचे आई-वडील किंवा नातलग तक्रार देण्यासाठी पुढे न आल्याने साक्षीदार सचिन नागनाथ पोटे ( वय ३३, इस्कॉन मंदिरजवळ, भिस्तबाग, सावेडी, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महेश माणिक मेटे याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली.
संशयित आरोपी महेश मेटे इस्कॉन मंदिराजवळील एका भाड्याच्या खोलीत राहतो. सकाळी तो दुचाकीवर संबंधित मुलीस घेऊन आला. काही वेळातच त्याच्या खोलीतून मोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला. परिसरातील नागरिकही जमा झाले. सचिन पोटे यांनी मुलीला सोडवले. तिच्या गळ्यावर चाकूने वार झाले होते व ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानंतर आरोपी पसार झाला.
त्याच्या शोधासाठी पथके रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कोकरे यांनी दिली. घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक संदीप टिपसरे यांनी भेट दिली. मुलीची प्रकृती अत्यवस्थ असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती सावेडी उपनगरातीलच एका महाविद्यालयात ११ वीमध्ये शिकत आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या कारणांचा शोध सुरू असल्याचे निरीक्षक कोकरे यांनी सांगितले.