कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीचे वारे तापू लागले असून ती बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत. मुख्य लढत काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपाचे सत्यजित कदम यांच्यात होण्याची शक्यता आहे. आप, शेतकरी संघटना यांच्यासह निवडणुकीवेळी हमखास हजेरी लावणारे काही चेहरेही रिंगणात उतरत आहेत.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर महिन्यात निधन झाले. या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे होते. मात्र त्याला प्रथम शिवसेना नंतर भाजपाने दाद दिली नाही.
मैत्रीपूर्ण लढत करण्यास काँग्रेसचा विरोध –
या मतदारसंघात यापूर्वी निवडून आलेले शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी महाविकास आघाडी अंतर्गत मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार असल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. तर मैत्रीपूर्ण लढत करण्यास काँग्रेसचा विरोध असून महाविकास आघाडीचा एकच उमेदवार आखाड्यात असावा या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत जयश्री जाधव यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.
भाजपाकडून सत्यजित कदम –
कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याने पोटनिवडणूकही त्याच मार्गाने जाणार का? अशीही चर्चा कोल्हापुरात रंगली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी हे फेटाळले आहे. विधान परिषदेच्या तीन जागांसाठी चर्चा होऊन महाविकास आघाडी व भाजपा यांच्यात निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला होता. आता कोल्हापुरात ती शक्यता नाही. माजी नगरसेवक सत्यजित कदम व देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव ही दोन नावे केंद्रीय समितीकडे पाठवली आहेत. त्यात सत्यजित कदम यांच्या नावाला प्राधान्य राहणार आहे. पाच राज्यातील निवडणुकीचा कल पाहता मतदार काँग्रेस विरोधात असल्याने या निवडणुकीत भाजपाचा विजय होईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केला आहे.
बहुरंगी लढत –
जयश्री जाधव – सत्यजित कदम यांच्या जोरदार लढत होणार हे स्पष्ट असताना अन्य काही पक्षांनी रिंगणात उतरण्याचे ठरवले आहे. पंजाब विधानसभा निवडणुकी सत्ता मिळवल्याने आम आदमी पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. आपचे संदीप देसाई यांनी आज प्रचाराला सुरुवात केली. रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे उमेदवार बाळ नाईक यांनी आज प्रचार नियोजन बैठक घेतली. शिवसंग्राम पक्षाच्यावतीने करुणा शर्मा या महिलांचा मुद्दा घेऊन लढत देणार आहेत. तर साताऱ्याचे अभिजित बिचुकले यांनीही निवडणूक लढविण्याचा इरादा व्यक्त केला आहे. बऱ्याच अपक्षांनीही अर्ज भरण्याची तयारी ठेवली आहे.