सांगली : शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे वैयक्तिक व सांघिक विजेतेपद कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाने पटकावले. मिरजेच्या डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या युवा महोत्सवात सांगलीसह सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील १७८ महाविद्यालयातील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.

शिवाजी विद्यापीठाच्या ४५ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा समारोप समारंभ मिरजेतील साळुंखे महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. विजेत्यांना चषक प्रदान करण्यात आला. प्रारंभी प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

युवा महोत्सवामध्ये विविध ३६ प्रकारामध्ये कला प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. यावर्षीच्या युवा महोत्सवात कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाने वैयक्तिक व सांघिक प्रकारात अव्वल स्थान पटकावले. तर वैयक्तिक विभागामध्ये कोल्हापूरच्या दि न्यू कॉलेजने उप विजेतेपद व सांघिक विभागामध्ये फलटणच्या मुधोजी कॉलेजने उप विजेतेपद पटकावले. लोककला प्रकारात विट्याच्या बळवंत कॉलेजने प्रथम, मुधोजी कॉलेजने द्वितीय क्रमांक पटकावला. नृत्य विभागात मुधोजी कॉलेज, नाट्य व संगीत विभागात विवेकानंद कॉलेज, कला विभागात अधिविभाग शिवाजी विद्यापीठ आणि वाड्मय विभागात राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी इस्लामपूर हे संघ अव्वल ठरले.

पाथर्डीतील तरुण पुरात वाहून गेला

विजेत्यांना कुलगुरू डॉ. शिके यांच्या हस्ते प्रमाणपत्र व चषक प्रदान करण्यात आला. युवा महोत्सवाच्या सांगता समारंभापूर्वी सहभागी विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढली. यामध्ये १५ महाविद्यालयातील संघ सहभागी झाले होते.