लोकप्रिय पुस्तक ‘कोल्हाट्याचं पोर’चे लेखक दिवंगत डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या आईची स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी धडपड सुरू आहे. मुलाला डॉक्टर केल्यानंतर सुखाचे दिवस बघायला मिळतील असं वाटत असतानाच शांताबाई काळे यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले. त्यांचा मोठा आधार गेला. तब्बल ४० वर्षे लावणी कला जोपासणाऱ्या आणि लावणी करून आपल्या मुलाला लहानाचा मोठा करून डॉक्टर बनवणाऱ्या शांताबाईंचा वनवास अजून संपलेला नाही. परंतु मुलाच्या निधनानंतर डॉ. किशोर काळे यांच्या आई शांताबाई काळे या आज अत्यंत दयनीय अवस्थेत आयुष्य जगत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे १,५०० रुपये मानधन आणि डॉक्टर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच त्या त्यांचा दैनंदिन उदरनिर्वाह करत आहेत. शांताबाई काळे म्हणाल्या की, कलावंतांचे मानधन देखील वेळेवर मिळत नाही. त्यास तीन-तीन महिने विलंब होतो. राहायला घर नाही. त्या अजूनही भाड्याने राहतात. घराचं भाडं द्यावं की पोट भरावं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. अशा परिस्थिती त्या कसंबसं आयुष्य जगत आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी साडेचार वर्षांपूर्वी शांताबाई काळे यांना घर देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच डॉ. भारुड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन आवश्यक ती मदत करण्यास सांगितले होते. त्यावेळी करमाळा तालुक्यातील नेरले येथे त्यांना घरासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली. त्या जागेच्या उताऱ्यावर शांताबाई काळे यांचे नाव लागले. बांधकाम देखील सुरू झालं होतं. दरम्यान, सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली झाली त्यानंतर मात्र विविध अडचणीमुळे हे बांधकाम खोळंबले आहे. प्रशासकीय स्तरावर संबंधित अधिकार्‍यांकडून याकडे दुर्लक्ष झालं.

अधिकारी, मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निवदने, मात्र कार्यवाही शून्य

बांधकाम खोळंबल्यानंतर पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांना भेटून अर्जाद्वारे विनंती करण्यात आली. राहायला घर मिळावे यासाठी मागणी केली. त्याचबरोबर मुंबई येथे मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनाही लेखी निवेदन देण्यात आले. काही दिवसांपूर्वीच नागपूर येथे जाऊन हिवाळी अधिवेशनावेळी त्यांनी राहायला हक्काचे घर आणि वेळेवर मानधन मिळावे या मागणीसाठी पाठपुरावा केला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिनिधींना निवेदन दिले. त्यांनीही कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनाही निवेदन दिले. परंतु आश्वासनापलिकडे ठोस अशी कार्यवाही झालेली नाही. तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनाही पत्र लिहिले होते. राज्यपाल कार्यालयाकडून सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाचे प्रधान सचिव यांना शांताबाई काळे यांचे घर आणि उदरनिर्वाहासंदर्भात लिहिलेले पत्र पुढे पाठवण्यात आले. त्यावरही कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे शांताबाई काळे यांनी सांगितले.

हे ही वाचा >> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे राष्ट्रवादीत, पक्ष प्रवेशाचं कारण सांगताना म्हणाले “अजित पवार, सुप्रिया सुळे…”

मुलाच्या निधनानंतर शांताबाई काळे यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला, त्यांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. आणखी किती हेलपाटे मारायचे? असा सवाल शांताबाईक काळे यांनी केला आहे. त्यांचं वय आता ६९ वर्ष इतकं आहे. त्यामुळे आता सरकारी कचेऱ्यांचे हेलपाटे करणं त्यांना जमत नाही. मुख्यमंत्री आणि शासनाने हक्काचं घर मिळवून द्यावे आणि स्वतःच्या हक्काच्या घरात मरण यावं आपली शेवटची इच्छा शांताबाई यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhatyacha por writers mother shantabai kale struggling for home rno news asc
First published on: 31-01-2023 at 16:18 IST