अलिबाग : तस्करीमुळे कोकणातील खवले मांजर अती दुर्मिळ वन्यजीवाचे अत्सित्व धोक्यात आले आहे. गेल्या काही वर्षात कोकणात खवले मांजर तस्करीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने या प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा अतिशय दुर्मिळ समजली जाणारी ही वन्यप्रजाती नामशेष होण्याची भिती वन्यजीव अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षात खवले मांजर तस्करीची अनेक प्रकरणे जिल्ह्यात समोर आली आहे. मात्र कारवाई नंतरही या प्राण्याची तस्करी थांबलेली नाही. ट्रेड रेकॉर्डस ॲनालिसिस ऑफ फ्लोरा अँड फाउना इन कॉमर्स आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ – इंडिया यांनी खवले मांजर यांची होणाऱ्या शिकारी बद्दलची माहिती प्रकाशित केली आहे. देशात महाराष्ट्राचा खवले मांजरांच्या जप्तीवरील कारवाई करण्यात दुसरा क्रमांक लागतो. तर देशात अवैध वन्यजीव व्यापारासाठी वर्षभरात १ हजार २०३ खवले मांजरांची शिकार आणि तस्करी झाल्याचे नोंद आहे. या तस्करीमुळे खवले मांजरांचे अस्तित्व मात्र धोक्यात येत चालले आहे.

नेपाळ, चीन, पूर्व आशिया आणि दक्षिण अफ्रिकेतून या खवले मांजराला मोठी मागणी असते, जादू टोणा आणि औषध निर्मितीसाठी यांचा वापर केला जात असल्याचे जाणकार सांगतात. आंतराराष्ट्रीय बाजारात याला चांगली किंमत मिळते. त्यामुळेच या प्राण्याच्या तस्करीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोकणामध्ये सापडणारे खवले मांजर हे साधारणत पांढरट पिवळ्या रंगाचे असते. हा एक अतिशय लाजाळू, निशाचर प्राणी आहे. याचे मुख्य खाद्य म्हणजे मुंग्या वाळवी सदृश कीटक असून ज्या जंगलांमध्ये वाळवी चे प्रमाण मुंग्यांची वारुळे अधिक असतील अशा ठिकाणी त्याच वास्तव्य आढळून येते. त्याच्या तोंडात दात नसतात एक लांब जिभेच्या सहाय्याने तो मुंग्या खातो. कोकणातील दऱ्याखोऱ्यांत मधील सावलीची दाट जंगले, सदाहरित वने, निम्न सदाहरीत शुष्क जंगल हा या प्राण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे या मांजराचा अधिवास या परिसरात आढळतो.

कशी आणि कुठून होते तस्करी…

गेल्या काही वर्षात श्रीवर्धन मुरुड ,अलिबाग, महाड, खोपोली, सुधागड पाली, कर्जत, पनवेल आदी भागांतून फार खवले मांजराची तस्करीचे प्रकार समोर आले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर मध्यप्रदेश मध्ये गोरखपुर व इतर पूर्व भागातून हे खवले मांजर नेपाळला पाठवले जातात. तिथून ते चीन, पूर्व आशियाई प्रदेशांमध्ये देशात पाठविले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सवंधर्नासाठी सुरु असलेले प्रयत्न…

कोकणातील खवले मांजर संवर्धनासाठी चिपळूणमध्ये सह्याद्री निसर्ग मित्र संस्था अध्यक्ष भाऊ काटदरे व त्यांचे सहकारी गेली अनेक वर्ष गावागावांतून काम करत आहेत. रायगड परिसरामध्ये सिस्केप संस्था, वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या माध्यमातून काही गावांमध्ये संवर्धनात्मक काम चालू आहे. मात्र या प्राण्याच्या तस्करीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन व्यापक उपाययोजना करण्याची गरज आहे.तस्करीमुळे कोकणातील खवले मांजरांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. त्यामुळे खवले मांजराचे अस्तित्व असलेले क्षेत्र संरक्षित होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वनविभागाच्या राखीव वनक्षेत्राचा दर्जा पुनरुज्जीवित करणे गरजेचे आहे. वन्यजीव संरक्षक कार्यतत्पर फोर्सची नियुक्ती करणे गरजेचे आहे. याशिवाय स्थानिक निसर्गप्रेमी संस्था गावातील वन समिती आदींच्या माध्यमातून गावागावांतून जनजागृती अभियान राबवणे अपेक्षीत आहे, आम्ही ती मोहीम हाती घेत आहोत. प्रेमसागर मिस्त्री, अध्यक्ष, सिस्केप संस्था