राहाता: कोळ नदीच्या पुराच्या वेढ्यात १२ तासांहून अधिक काळ अडकलेल्या वारी (ता. कोपरगाव) शिवारातील टेके कुटुंबातील सहा जणांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून काल, रविवारी रात्री ११ वाजता सुरक्षित बाहेर काढले.

कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर टेके कुटुंबासह वारी शिवारात वस्तीवर राहतात. कोळ नदीच्या पाण्याचा वेढा पडल्याने त्यांच्यासह परिवारातील ६ जण घरातच अडकून पडले होते. दिवसभर हे कुटुंब सुरक्षित होते. त्यांच्या घराकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर नदीच्या पुराचे पाणी ५ फूट चढल्याने ते सावध होते. परंतु पाणी अचानक वाढण्यास सुरुवात झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दुपारपासून प्रशासनाकडून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र पुराच्या तीव्र प्रवाहामुळे स्थानिक यंत्रणेला अपयश आले. त्यामुळे तातडीने नाशिकच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आले. पथक रात्री ८.३०च्या सुमारास दाखल होताच टेके कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. परंतु पथकाची बोट प्रयत्न करूनही सुरू झाली नाही. टेके यांच्या घराला पाण्याचा वेढा पडला होता. परंतु घरात पाणी न शिरल्याने सर्व सदस्य घरातच सुखरूप होते. पुराचे पाणी कमी झाल्याने १२ तासांनी प्रशासनाने दुसऱ्या रस्त्याने टेके कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले.

पर्यायी रस्त्याने बाहेर काढले

मधुकर टेके यांच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले होते. पुराचे पाणी कमी झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या रस्त्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यांना बाहेर काढण्यासाठी बोटीचा वापर करण्यात आला नाही. सध्या टेके कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप आहेत. – महेश सावंत, तहसीलदार, कोपरगाव

खडकीत ४० घरांची पडझड

मुसळधार पावसाने कोपरगाव तालुक्यातील शेती, घरे, व्यापारी संकुलात पाणीच पाणी होऊन पूर्ण तालुका जलमय झाला आहे. उपनगरात पूरजन्य परिस्थिती असून ग्रामीण भागाला पावसाने जोरदार झोडपले. मका, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. नगर – मनमाड रस्त्यासह इतर काही रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली. रात्री खडकी भागातील ४० ते ५० पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी खडकी भागातील पाण्याचा प्रवाह सुरळीत केला. तहसीलदार, मुख्याधिकारी, कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.