कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात राहुल फटांगडेच्या हत्या प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून २१ वर्षीय सुरज शिंदेला ताब्यात घेतले आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथून सूरजला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येते.
सूरज हा मुळचा दौंड तालुक्यातील भीमनगरचा रहिवासी आहे. यापूर्वी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांनीही राहुलची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता. हे तिन्ही आरोपी अहमदनगरमधील आहेत.
राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी चार आरोपींची छायाचित्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) जारी केली होती. दि. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगडेची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा इथून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सीआयडीने आणखी चार नव्या आरोपींची छायाचित्रे आणि चलचित्रे जारी केली. या आरोपींबद्दल माहिती देण्याचे आवाहन सीआयडीने केले आहे.