कराड : कोयना धरणाचे सहाही वक्री दरवाजे पाचव्यांदा उघडण्यात आले आहेत. आज रविवारी कोयनेचा धरणसाठा शंभर टीएमसीहून (अब्ज घनफूट) अधिक आणि जलआवाक ११ हजार ९७६ क्युसेक (प्रतिसेकंद घनफूट) असताना, सकाळी नऊ वाजल्यापासून धरणाचे दरवाजे एक फुटांनी उघडून कोयना नदीपात्रात ८ हजार ३०० क्युसेकचा जलविसर्ग करण्यात येत आहे. तर, धरणाच्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्युसेकचा विसर्ग कायम आहे.

पश्चिम घाटक्षेत्रात सलग चौथ्या दिवशी केवळ तुरळक पाऊस होत असून, कोयना धरणाच्या पाणलोटातही हीच स्थिती आहे. कोयना धरणक्षेत्रात रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत केवळ नऊ मि.मी. पाऊस झाला आहे. असाच तुरळक पाऊस सर्वत्र दिसत आहे. सध्या कोयना धरणातील आवक पाण्याइतकाच कोयना नदीपात्रात जलविसर्ग करून धरणसाठा शंभर टीएमसीच्या जवळपास नियंत्रित करण्याचे धरण व्यवस्थापनाचे नियोजन दिसत आहे. कोयनेच्या दरवाजातून हा सर्वसाधारण विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा, कोयना नद्यांच्या पाणीपातळीत फारसा फरक पडणार नसून, सध्या या दोन्ही प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्याही पात्रातून वाहत आहेत. गेल्या २४ तासांत कोयना धरणातील जलआवक १५ हजार १६३ क्युसेकवरून १३ हजार ४३९ क्युसेकपर्यंत खाली येताना, धरणात १.१६ टीएमसी पाण्याची भर पडली आहे.

कोयना पाणलोटात आज रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगरला ८ एकूण ४ हजार ५७ मि.मी., नवजाला ७ एकूण ४ हजार ९७० मिमी. तर, महाबळेश्वरला १२ एकूण ४ हजार ७२४ मिमी. पाऊस झाला आहे. कोयना पाणलोटात हंगामात आत्तापर्यंत सरासरी ४ हजार ५८३.६६ मिमी. (वार्षिक सरासरीच्या ९१.६७ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.