कराड : कोयना धरणात सध्या दोनतृतीयांशहून अधिक पाणीसाठा झाला असून, जुलै व ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असल्याने पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाण्याच्या विसर्गाचे आत्तापासून नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहेत.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे कोयना धरणातील सध्याची पाणीपातळी, पाऊसमान तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभय काटकर, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मागील तीन वर्षांतील पावसाचा अभ्यास आणि यावर्षीच्या संभाव्य पावसाचा अंदाज लक्षात घेऊन विशेषतः कोयना धरणातून जलविसर्गाचे बारकाईने नियोजन करण्याच्या सूचना देत पालकमंत्री म्हणाले, कोयना नदीला उपनद्यांचे पाणीही मिळते. त्यामुळे जलविसर्गाचे अधिक काटेकोर नियोजन असावे, पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात यावा, लोकांची कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच, मंडलाधिकारी, तलाठी, पोलीस पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन पुराचा संभाव्य धोका असलेल्या गावांमध्ये आवश्यक उपाययोजना आखण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
याशिवाय कोयना व अन्य नद्यांकाठच्या गावांचा आढावा त्यांनी घेतला. महापूर आल्यास संबंधित नदीकाठच्या गावातील लोकांसह नदीकाठच्या लोकवस्तीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
मंत्र्यांच्या सूचना
संभाव्य पावसाचा अंदाज लक्षात घेऊन विशेषतः जलविसर्गाचे नियोजन करावे. कोयना नदीला उपनद्यांचे पाणीही मिळते. त्याचाही आढावा घेत कोयनेच्या जलविसर्गाचे अधिक काटेकोर नियोजन असावे. पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात यावा, लोकांची कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच, मंडलाधिकारी, तलाठी, पोलीस पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन पुराचा संभाव्य धोका असलेल्या गावांमध्ये आवश्यक उपाययोजना आखाव्यात.