लातूर : घरबांधणीतील लातूर पॅटर्न हा महाराष्ट्राला दिशादर्शक असून लातूर शहरातील क्रीडाई संस्थेचे काम राज्यात सर्वात अव्वल दर्जाचे असल्याचे प्रतिपादन क्रीडाईचे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांनी केले. लातूर शहरातील क्रीडाईच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभ निमित्त ते बोलत होते. व्यासपीठावर आ. अमित देशमुख, आ. संभाजी पाटील निलंगेकर ,महापालिका आयुक्त देविदास जाधव ,क्रीडाईचे जगदीश कुलकर्णी ,संतोष हत्ते, उदय पाटील , विष्णू मदने,धर्मवीर भारती आदी उपस्थित होते. तावरे म्हणाले आम्हा बारामतीकरांना लातूरकरांचा अभिमान वाटतो .केवळ शिक्षणात नाही तर घर बांधणीत देखील लातूर पॅटर्न महाराष्ट्राला दिशादर्शक आहे .गतवर्षी राज्यस्तरीय सात पुरस्कार लातूर क्रीडाईने पटकावले आहेत .सर्व ठिकाणी येथील बांधकाम व्यवसायीक अतिशय हिरीहिरीने भाग घेतात व उत्तम दर्जाची घरबांधणी लातूरात होत असल्याचे ते म्हणाले.

महापालिका आयुक्त देविदास जाधव यांनी साधारणपणे दहा वर्षात 15 टक्के व पंधरा वर्षात 22 टक्के एखाद्या शहराची वाढ होते .गेल्या 15 वर्षात लातूरची लोकसंख्या तीन लाखावरून सहा लाख झाली आहे ,शंभर टक्के वाढ झाली आहे .वाढत्या शहराच्या समस्या ही तेवढ्याच असतात ,वाहतूक समस्या ही भीषण असून ती सोडवण्यासाठी क्रीडाईने मदत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आ. संभाजी पाटील यांनी जगभरात वाहन समस्या मोठी आहे व विविध देशात त्यावरती चिंतन चालू आहे लातूर शहरात आगामी 25 वर्षात नवीन प्रश्न निर्माण होणार नाहीत, त्यावर उत्तर आत्तापासून शोधायला हवे असे ते म्हणाले .

आ. अमित देशमुख यांनी लातूरचे कौतुक अन्य शहर वासीयांकडून होते आहे याबद्दल आम्हाला आनंद आहे पंधरा वर्षात 100% लातूरात वाढ आहे व लातूर मध्ये शांतता आहे, सौहार्दाचे वातावरण आहे, ही परंपरा यापूर्वीच्या राजकारण्यांनी घालून दिली आहे त्याच पावलावर लातूरची वाटचाल सुरू आहे .आ. संभाजी पाटील निलंगेकर व आपण मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आगामी काळात शहराच्या विकासासाठी प्रयत्न करू, सामान्य माणसाच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे ते म्हणाले. नवीन पदाधिकाऱ्याला याप्रसंगी शुभेच्छा देण्यात आल्या.