कराड : कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याकडून अनेक सभासद, शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहे. कृष्णा साखर कारखान्याने उच्चांकी ऊसदराची परंपरा जपत, सन २०२४-२५ सालच्या हंगामात गळितास आलेल्या उसासाठी ३,३११ रुपयांचा अंतिम ऊसदर जाहीर केला आहे. हा ऊसदर सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक असून, विनाकपात १११ रुपयांचे अंतिम देयक लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ सालच्या गळीत हंगामात १२,३९,००८ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून, सरासरी साखर उतारा १२.५७ टक्के राहिला आहे. तसेच १४,५१,१५७ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.

कृष्णा साखर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. कारखान्याने उच्चांकी ऊसदराची परंपरा जोपासत गेल्या गळीत हंगामासाठी ३,३११ रुपयांचा अंतिम दर जाहीर केला आहे. कृष्णा कारखान्यास सन २०२४-२५ सालच्या गळीत हंगामात ऊस घातलेल्या सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांना यापूर्वी ३,२०० रुपयांप्रमाणे देयक अदा करण्यात आले आहे. तर, आता विनाकपात १११ रुपयांचे अंतिम देयक लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार असल्याचे कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. कृष्णा कारखान्याकडून उच्चांकी ऊसदर जाहीर झाल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून स्वागत होत असून, डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाचे आभार मानले जात आहेत.

कृष्णा कारखान्यातील सत्ताधारी गटाचे नेते आणि अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचे पुत्र डॉ. अतुल भोसले हे विधानसभेवर निवडून जाताना राज्यातील सत्ताधारी भाजपचे जिल्हाध्यक्षही आहेत. या सत्तेच्या माध्यमातूनही कृष्णा सहकारी साखर कारखान्याला मोठी मदत होणार असल्याने भविष्यात कृष्णा कारखान्याकडून सभासदांना आणखी ज्यादाचा ऊसदर देण्यासह कारखान्याची व सभासदांची प्रगती साधणे शक्य होणार असल्याचे कृष्णा कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाला विश्वास वाटत आहे.