कराड : जुन्या कृष्णा साखर कारखान्याचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करण्यात आल्याने कारखान्याची गाळप क्षमता वाढली, त्यातून मोठी आर्थिक बचत झाली आहे. कामाचे दिवस कमी झाले असले तरी कामगारांना जास्तीचे दिवस कामावर आम्ही ठेवत आहे. आता त्यांच्या हाताला सातत्याने काम मिळण्यासाठी मोठ्या योजना सुरू करणार असल्याचे ‘कृष्णा’चे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केले. ज्यांनी जे काही दिवे लावले त्यांचा हिशेब नक्की होईल, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आमदार डॉ. अतुल भोसले, माजी आमदार भगवान साळुंखे, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप व संचालक मंडळ, सभासदांची उपस्थिती होती. कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी अहवाल वाचन केले, सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, पारदर्शक कामे केल्याने कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पुरस्कार मिळाले आहेत. माजी संचालकांनी कामगारांच्या नावाखाली वर्षाला १८ ते २० कोटी रुपयांची उधळण केली, त्यांचा मस्टर किंवा कोठेही नामोल्लेख नव्हता. डिस्लरीमध्ये महाराष्ट्र मेड लिकर अर्थात विदेशी मद्य तयार करण्यात येणार आहे. शिवाय डॉ. भोसले यांनी सभासदांनी विचारलेल्या काही लेखी प्रश्नांना उत्तरे दिली, तर कारखान्याच्या सत्तेचा गैरवापर करून ज्यांनी काही कर्म केले आहे, त्यांचा हिशेब होईल. ही गोष्ट न्यायप्रविष्ट असल्याने आपण जास्त बोलणार नाही, असेही ऐनवेळी विचालेल्या प्रश्नांचे उत्तर देवून डॉ. सुरेश भोसले यांनी विरोधकांना इशारा दिला.

कामाचे दिवस कमी झाले असले तरी कामगारांना जास्तीचे दिवस कामावर आम्ही ठेवत आहे. आता त्यांच्या हाताला सातत्याने काम मिळण्यासाठी मोठ्या योजना सुरू करणार असल्याचे ‘कृष्णा’चे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केले. ज्यांनी जे काही दिवे लावले त्यांचा हिशेब नक्की होईल, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्याच्या गेल्या निवडणुकीत ‘मोफत साखर, घरपोच साखर,’ असे शेतकऱ्यांसाठी जे बोललो ते कृतीतून संचालक मंडळाने करून दाखवले आहे. निवडणूक आली की, चार प्रश्न विचारून काहीजण फुशारकी मारत आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या उपसा सिंचन (लिप्ट इरिगेशन) योजना अडचणीत आहेत. त्या सुरू राहण्यासाठी आपण शासनाकडून आर्थिक पाठबळ मिळवणार असून, आवश्यक निधी आणणार असल्याची ग्वाही आमदार डॉ. अतुल भोसले यांनी या वेळी दिली.