सातारा : कुसगाव (ता. वाई) या गावच्या हद्दीत सुरू असणारे क्रशर व खाण तत्काळ बंद करावे, यासाठी कुसगाव ग्रामस्थांनी मुंबईकडे मोर्चा काढला आहे. गावातील २०० नागरिक कुसगावहून मुंबईच्या दिशेने चालत निघाले असून, ते पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत माजी आमदार मदन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काही निवडक ग्रामस्थांसह भाजप सातारा जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले यांनी आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत ही मागणी त्यांच्या कानावर घातली.
आंदोलकांच्या वतीने सुरभी भोसले यांनी बावनकुळे यांना ग्रामस्थांच्या सर्व अडचणी सविस्तरपणे सांगितल्या. तसेच या क्रशरमुळे होणारा सततचा धुळीचा त्रास, त्याचा श्वसनावर होणारा परिणाम तसेच पिकांवर होणारा परिणाम आणि सातत्याने रात्रंदिवस होणारी डंपरची वाहतूक, क्रशरचा आवाज, ब्लास्टिंगमुळे होणारे पर्यावरणाचे दुष्परिणाम याविषयी वस्तुस्थिती सांगून हे क्रशर कसल्याही परिस्थितीत बंद करण्याची आग्रही मागणी केली. त्यानंतर बावनकुळे यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले व येत्या बुधवारी ३० तारखेला आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
आंदोलकांच्या वतीने एकसरच्या माजी सरपंच धनश्री पार्टे, युवराज पार्टे, विकी पार्टे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रोहिदास पिसाळ, मंडल अध्यक्ष सर्वश्री विजय ढेकाणे, दीपक ननावरे, गणेश सुतार, जिल्हा उपाध्यक्ष अजय मांढरे आणि गौरव जगताप व यश चव्हाण उपस्थित होते.