सोलापूर : कार्तिकी यात्रेसाठी अवघे पंढरपूर लाखो वारकरी आणि भाविकांच्या गर्दीने गजबले आहे. यंदा यात्रेत गुरूवारी अडीच लाख भाविक दाखल झाले असून उद्या कार्तिकी एकादशीला चार लाखांपेक्षा अधिक भाविकांची मांदियाळी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पंढरपूर भाविक आणि वारक-यांनी फुलून गेले असून सर्व मठ, धर्मशाळा, हाॕटेल, लाॕजमध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे. विठ्ठल मंदिर व चंद्रभागा नदी परिसरातील वाळवंट व लगतच्या ६५ एकर मैदानासह सर्व छोटे-मोठे रस्ते गर्दीने गजबजून गेले आहेत. चंद्रभागा वाळवंटासह धर्मशाळा आणि मठांमध्ये भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होत आहेत. टाळ-चिपळ्यांसह सर्वत्र विठ्ठलनामाचा गजर ऐकायला मिळत आहे. सर्वत्र भक्तीचा मळा फुलून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्तिकी एकादशीनिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे विठ्ठल मंदिरात महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची महापूजा होणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या सोबत सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, फलोत्पादन व रोहयोमंत्री संदीपान भुमरे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचीही उपस्थिती राहणार आहे.

हेही वाचा…Maharashtra News Live: अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदानाला सुरूवात; महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर!

कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्राच्या विविध दूरवरच्या भागासह शेजारच्या कर्नाटक व अन्य प्रांतांतून भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. अनेक छोट्या- मोठ्या गावांतून वारक-यांच्या दिंड्या मजल-दरमजल पायी चालत विठ्ठल दर्शनाची आस मनात बाळगून पंढरपुरात दाखल होत आहेत. रात्रीपर्यंत हजारो दिंड्या पंढरीत पोहोचतील. यानिमित्ताने भाविक आणि वारक-यांच्या गर्दीचा आकडा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. भाविकांना विठ्ठल दर्शनाची ओढ लागली असून त्यासाठी दर्शन रांग मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दर्शन रांगेतून विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात पोहोचायला १२ ते १४ तासांचा अवधी लागत आहे. दर्शन रांगेत भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत.

हेही वाचा… रवी राणांसोबतच्या वादानंतर आता पुढे काय? आगामी निवडणुकीत कोणाशी युती? बच्चू कडू म्हणाले…

आषाढी यात्रेनंतर कार्तिकी यात्रा मोठ्या प्रमाणावर भरते. यात्रेचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या अधिपत्याखाली प्रशासन रात्रंदिवस कार्यरत आहे. यात्रा व्यवस्थापन यशस्वी होण्यासाठी यंत्रणेने कंबर कसली आहे. विठ्ठल मंदिर नयनरम्य विद्युत रोषणाईने सजले आहे. यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा एसटी बसेसची सोय केली असून त्याशिवाय रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेची सोय केली आहे. खासगी वाहनांची रेलचेल वाढली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhs devotees gather in pandharpur for kartiki yatra asj
First published on: 03-11-2022 at 16:37 IST