Barsu Refinery Project : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. हा प्रकल्प प्रस्तावित ठिकाणी होण्याकरता सत्ताधारी प्रयत्नशील असून प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी जोरदार आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाला राजकीय पाठबळही मिळत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनीही ग्रामस्थांच्या पाठिशी राहण्याची भूमिका घेतली असून त्यांनी आज बारसूतील भूमिफायांविरोधात टीका केली. तसंच, बारसूमध्ये जम्मू ते दिल्लीपर्यंतच्या परप्रांतीयांनी जमिनी घेतल्या असल्याचेही त्यांनी आज स्पष्ट केले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

विनायक राऊत म्हणाले की, “रिफायनरी भूमाफियांचं भलं करणारी आहे, कोकणवासियांचं नाही. बारसूत २२४ परप्रांतीयांनी जमिनी घेतल्या आहेत. यात मोदी आणि शाहा यांची २०-२२ नावे आहेत. जम्मू काश्मीरपासून दिल्लीपर्यंतचे २२४ परप्रांतीय आहे. आता नाणार आणि बारसू येथील भूमाफियांमध्ये चढाओढ सुरू आहे. बारसूत प्रकल्प गेला तर नाणारमध्ये जमिनी घेतलेल्या परप्रांतीयांना करोडो रुपयांच नुकसान होणार. त्यामुळे त्यांच्यात आता रस्सीखेच सुरू झाली आहे”, असं विनायक राऊत म्हणाले.

हेही वाचा >> “सौदी अरेबियातील इस्लामिक ऑईल कंपनीसाठी, मराठी माणसांवर…”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

“महाराष्ट्राचं दुर्दैव”

“काल १४ कोटी महाराष्ट्राच्या जनतेचे कुटुंबप्रमुख एकनाथ शिंदे यांना पेटलेलं रणकंदन पाहायला वेळ मिळाला नाही. कदाचित इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांना अंधारात ठेवलं असेल, त्याची खातरजमाही मुख्यमंत्र्यांनी केली नाही. अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या, पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला. काहीजण रत्नागिरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची आम्ही चौकशीही केली. दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात तिथे लाठीमार अजिबात झाला नाही. आंदोलकांवर जबरदस्ती केली गेली नाही. छळ झाला नाही. हे उद्गार ऐकल्यानंतर आम्ही डोक्याला हात मारला. दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं की इतकं होऊनसुद्धा मुख्यमंत्री बोलत असतील तर आम्ही अजून काय बोलणार?” असंही विनायक राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“परवा जे सादरीकरण झालं त्यात ७० टक्के स्थानिक लोक आले होते असं सांगण्यात आलं. परंतु, यामध्ये स्थानिकांना त्यांची बाजू मांडायला प्रतिसाद मिळाला नाही. मीडियाच्या कॅमेऱ्यांना बाहेर ठेवण्यात आलं. भाजपा आणि समर्थक भूमाफियांचे दलाल तिथे आले. पण मीडियाच्या कॅमेऱ्यांना का बाहेर काढलं”, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.