छत्रपती संभाजीनगर : लातूर जिल्ह्यात रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तावरजा, तेरणा आणि मांजरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचा जोर वाढल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भुसणी धरणाचे दरवाजे वेळेवर न उघडल्याने तावरजा नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले. औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्प ७३ टक्के भरला असून माकणी येथील निम्न तेरणा धरण ८५ टक्के क्षमतेपर्यंत भरले आहे. पाणलोट क्षेत्रात आणखी पावसाची शक्यता असल्याने दोन्ही प्रकल्पांतून पाणी सोडण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, लातूर जिल्हा सीमा भागातील औराद शहाजानी परिसरात काल रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदीच्या संगमस्थळी पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. औराद शहाजानी–वांजरखेडा रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधणे, नदी–नाले व पुलांपासून दूर राहणे, मुलांना पाण्याजवळ न पाठवणे आणि पूरप्रवण भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.