छत्रपती संभाजीनगर : लेंडी प्रकल्पाच्या पाणलोटच्या क्षेत्रात झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसाने एक चारचाकी वाहून गेले आहे. ७० शेळा, पाच म्हशी, सात बैल, दोन टॅक्टर आणि एक मालवाहतूक वाहन वाहून गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. तालुक्यातील बोरगावला पावासाचा जबर फटका बसला असून जमीन खरवडून गेली असून शेतीतील उभे पीक वाहून गेले आहे. लातूर, नांदेड आणि कर्नाटक सीमारेषेवर वसलेलं धडकनाळ गाव पाण्याने वेढले गेले आहे.
धडकनाळ या गावातील एक किलोमीटरहून अधिक रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. उदगीर–मुक्रमाबाद–देगलूर मुख्य रस्ता धडकनाळ अशी वाहतूक ठप्प झाली आहे. कर्नाटक व सीमाभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला तुफान पूर आला. परिणामी बोरगाव आणि धडकनाळ गावांमध्ये पाणीच पाणी झाले असून घरे, शेती, रस्ते सगळे जलमय झाले.
उदगीर तालुक्यातील बोरगाव गावाला रात्रीतून झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली. गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.
लातूर: लेंडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसाने एक चारचाकी वाहून गेली आहे. ७० शेळ्या, पाच म्हशी, सात बैल, दोन ट्रॅक्टर आणि एक मालवाहतूक वाहन वाहून गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. तालुक्यातील बोरगावला पावासाचा जबर फटका बसला असून जमीन खरवडून गेली असून… pic.twitter.com/ExhqG0K4uR
— LoksattaLive (@LoksattaLive) August 18, 2025
गावातील अंगणवाडी केंद्र, घरे, गोठे, किराणा दुकाने आणि घरगुती साहित्य पूर्णपणे पाण्याखाली गेले. कपडे, धान्य, किराणा आणि अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येच्या गावातील शेकडो नागरिकांना घर सोडून मंदिरात आश्रय घ्यावा लागला. ‘अशा प्रकारचा पाऊस व एवढं मोठं नुकसान यापूर्वी कधीच झालं नव्हतं, ’असे गावकऱ्यांचे मत आहे.