प्रदीप नणंदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर विशेष परिश्रम घेऊन त्यांना चांगले यश मिळेल या दृष्टीने प्रयत्न करण्याचा चार दशकांपासून गाजणारा ‘लातूर पॅटर्न’ यंदा दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत लातूरचे सर्वाधिक विद्यार्थी असल्याने पुन्हा चर्चेत आला.

दहावीच्या परीक्षेत  पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लातूरचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत. लातूरच्या के शवराज विद्यालयाचे २५, देशीकेंद्र विद्यालयाचे २२, अहमदपूरच्या यशवंत विद्यालयाचे २०, उदगीरच्या लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयाचे १४ विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्यांच्या यादीत झळकले.

सुमारे ४० वर्षांपूर्वी लातूरच्या देशीकेंद्र आणि उदगीरच्या लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालान्त परीक्षेत लातूरचे नाव उज्ज्वल केले होते. गुणवत्ता यादी असताना शालान्त परीक्षेत राज्यात लातूरचे विद्यार्थी राज्यात सर्वप्रथम यायचे. देशीकेंद्र आणि लालबहाद्दूर या दोन शाळांमध्ये तेव्हा स्पर्धा असायची. परीक्षा पद्धतीत बदल झाला तरीही लातूरच्या शाळांनी गुणवत्ता टिकवली. दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांमध्ये लातूरचे विद्यार्थी अजूनही चमकतात.

लातूर पॅटर्न काय आहे ?

लातूर आणि आसपासच्या परिसरातील काही निवडक शिक्षण संस्थांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी गुणवत्ताधारक किंवा हुशार विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. शाळेत येताना वेळेवर यायचे, पण घरी परतताना घडय़ाळ बघायचे नाही, असा शिरस्ता तेव्हा रूढ झाला होता. दिवाळीपूर्वीच सारा अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षेची तयारी करून घेतली जात असे. अनेक शाळांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी एक वर्ष अगोदरच सुरू करण्यात आली होती. याचा चांगला परिणाम झाला. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिण्याचा सराव झाला. उत्तरपत्रिका कशा लिहायच्या याचे खास प्रशिक्षण दिले जाते. अंतिम परीक्षांमध्ये हे विद्यार्थी चमकतात. तेव्हा शिक्षण क्षेत्रात मुंबई, पुण्याची मक्तेदारी होती. लातूरच्याच विद्यार्थ्यांना एवढे यश कसे मिळते, तुलनेत मागास भागातील लातूरमध्ये गुणवत्ता एवढी आली कुठून, अन्यत्र असे प्रयत्न होत नाहीत का, अशा नानाविध शंका उपस्थित करीत लातूर पॅटर्नबद्दल संशय व्यक्त के ला गेला. लातूरचेच विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री होते. यामुळे लातूरला झुकते माप मिळते का, असाही सूर काही जणांनी लावला होता. मग लातूर परीक्षा मंडळाच्या उत्तरपत्रिका अन्य मंडळाकडून तपासून घेण्याची कल्पना पुढे आली. त्याची अंमलबजावणी झाली. तरीही लातूरचेच विद्यार्थी राज्यात चमकले होते. ‘लातूरला कितीही नावे ठेवलीत तरीही गुणवत्तेत लातूरचेच विद्यार्थी पुढे असतात, असे दिवंगत विलासराव देशमुख नेहमी अभिमानाने सांगायचे.

फक्त दहावीच नव्हे तर लातूरमधील बारावीच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले. यातूनच लातूरचे राजर्षी शाहू महाविद्यालय व दयानंद महाविद्यालय, अहमदपूरचे महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये चांगले गुण संपादन करून यश मिळविले. या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतल्यास वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणे सोपे जाते, अशी कीर्ती पसरली. यातूनच राज्याप्रमाणेच अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शिक्षणाबाबतीत लातूरच्या महाविद्यालयांचे अप्रूप वाटू लागले. हमखास यशाची हमी देणारे गाव अशी ख्याती झाल्यानेच महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील अनेक विद्यार्थी लातूरमध्ये येऊन शिक्षण घेतात.

लातूरमध्ये तर आता प्राथमिक शाळेपासून विशेष प्रयत्न केले जातात. प्रारंभापासून लक्ष दिल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते. परीक्षेत यश कसे मिळवायचे याचे तंत्र लातूरने विकसित केले आणि त्याचे परिणाम निकालात सातत्याने बघायला मिळतात. गेल्या वर्षी परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला होता. गेल्या वर्षी २० गुण देण्याचे अधिकार शाळांकडे नव्हते आणि प्रश्नपत्रिका १०० गुणांची होती. गतवर्षी निकालही घसरला होता. तेव्हा राज्यात २० विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले होते आणि विशेष म्हणजे त्यातील १४ विद्यार्थी लातूरचे होते.

शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि संस्थाचालक यांच्या सामूहिक प्रयत्नांतूनच लातूरची गुणवत्ता टिकून आहे. गतवर्षी के शवराज विद्यालयातील सात विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. यंदा ही संख्या २५ झाली. विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

– नितीन शेटे, कार्यवाह, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, लातूर

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur pattern in discussion again after 10th result abn
First published on: 31-07-2020 at 00:23 IST