scorecardresearch

“लोकप्रतिनिधींमुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात” अजित पवारांचा गृहमंत्री फडणवीसांच्या कार्यक्षमतेवर सवाल, म्हणाले, “त्यांच्या पत्नीला…”

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवर सवाल केले.

Ajit Pawar Devendra Fadnavis
विधानसभेच्या अधिवेशनावेळी अजित पवार यांनी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोट ठेवलं.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेच्या अधिवेशनावेळी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर सरकाला प्रश्न विचारले. तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवर सवाल केले. पवार म्हणाले की, “राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं प्रत्येक सरकारसमोरचं मोठं आव्हान असतं. हे सरकार त्यात अपयशी ठरल्याचं चित्र राज्यात दिसत आहे.”

विरोधी पक्षनेते म्हणाले की, “या सरकारशी संबंधित लोकांचं नऊ महिन्यातलं वागणं बघा, लोकप्रतिनिधींचं बोलणं बघा, यांच्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. सरकार स्थापन होऊन नऊ महिने झाले तरी कायदा आणि सुव्यवस्थेची घडी नीट बसलेली नाही. मंत्री शंभूराज देसाईंच्या पाटण तालुक्यात गोळीबाराची घटना घडली. बाहेरच्या जिल्ह्यातून लोक येतात आणि गोळ्या घालून जातात. अशा घटना राज्यात अनेक ठिकाणी होत आहेत”

हे ही वाचा >> “आमचे फोटो लावून खोके आणि मिंधे म्हणणं किती योग्य?” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल

“कायदा आणि सुव्यवस्थेशी तडजोड सुरू आहे”

अजित पवार म्हणाले की, “राज्यात अनेक ठिकाणी तलवारी घेऊन फिरणं, लोकांवर हल्ले करणं, खून, दरोडे, अपहरणं, घरफोड्या अशा घटना पाहायला मिळत आहेत. या अशा घटनांमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला गेला, यावरून राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था लक्षात येते. सत्ता टिकवण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेशी तडजोड केली जातेय की काय अशी शंका उपस्थित होत आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 14:26 IST

संबंधित बातम्या