अलिबाग येथील युवासेनेच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराचा समारोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने होणार होता. यासाठी राज्यभरातील युवासेना कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या चिंतन शिबिरात उद्धव ठाकरे राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आसूड ओढतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर त्यांच्या पदरी निराशा आली.
जवळपास चाळीस मिनिटे चाललेल्या भाषणात उद्धव यांनी ऐतिहासिक तसेच स्वातंत्र्यलढय़ातील घटनांचे दाखले देत युवकांना संघटित होण्याचा संदेश दिला. नुसती गर्दी जमवून काही होणार नाही, तर समाजाला संघटित करून विशिष्ट ध्येयाने एकत्र येण्यास प्रवृत्त केले पाहिजे, असे मत उद्धव यांनी या वेळी व्यक्त केले. सोशल नेटवर्किंगचा वापर योग्य प्रकारे करणे आता पक्ष कार्यकर्त्यांना शिकावे लागणार आहे, असेही उद्धव यांनी सांगितले. ‘केवळ निवडणुका जिंकणे हे आपले ध्येय नाही, तर निवडून आल्यावर सुशासन देणे हेही आपले कर्तव्य असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.
येणारा काळ हा युवकांचा आहे. युवकांचा देश म्हणून भारत ओळखला जाणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना युवकांच्या शक्तीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. या युवकांना चांगले संस्कार देणे, त्यांना घडवण्याचे काम आमच्या पिढीवर असल्याचे सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शीतल म्हात्रेंना न्याय मिळेल
शीतल म्हात्रे या सेनेच्या नगरसेविका आहेत. त्यांची जबाबदारी आमच्यावर आहे. मी त्यांच्याशी बोललो आहे. महिलेचा आदर करणे ही सेनेची परंपरा आहे. हा पक्षांतर्गत प्रश्न असून तो आम्ही सोडवू. महिला आयोगाने आणखीनही बरीच महिला अत्याचाराची प्रकरणे आहेत, त्यात लक्ष घालावे, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.
सरांची अनुपस्थिती
कार्यक्रमाला मनोहर जोशी उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे मूळचे नांदवीचे असतानाही सरांना निमंत्रण नव्हते काय, असा प्रश्न आहे. दोनच दिवसांपूर्वी महायुतीच्या बैठकीला सर होते. मात्र युवासेनेच्या शिबिराला इतर नेते उपस्थित असताना जोशीसर कुठे गेले असा प्रश्न पडला.
महायुतीत मनसे नाहीच
भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी महायुतीत मनसेला घेण्याची सूचना केली असल्याची चर्चा आहे, मात्र चर्चेत तथ्य नाही. हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. काल मी काही वाहिन्यांवर अशा स्वरूपातील बातम्या पाहिल्या, या वेळी काही सूत्रांनी माहिती दिल्याचे सांगितले जात होते. हे सूत्र तुमच्या कामाचे नाही. महायुतीत मनसेला स्थान नाही. आमची महायुती भक्कम असून आमच्यात कोणतेही वाद नसल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले.