|| प्रबोध देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला-बुलढाणा-वाशीम विधान परिषद निवडणूक

अकोला : विधान परिषदेच्या अकोला-बुलढाणा-वाशीम स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या येत्या शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया हे नेहमीप्रमाणे ‘जादू’ करीत जागा कायम राखतात की भाजपचे वसंत खंडेलवाल हे चमत्कार करतात याचीच उत्सुकता आहे.

 विधान परिषदेच्या निवडणुकीत सहापैकी चार मतदारसंघात निवडणूक बिनविरोध झाली. विदर्भातील अकोला नागपूर या ठिकाणी मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात सामना रंगत आहे. विधान परिषदेचा अकोला, वाशीम व बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जातो. गेल्या सलग चार निवडणुका शिवसेनेने जिंकल्या आहेत. विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी ‘हॅट्ट्रिक’ साधली असून पुन्हा चौथ्यांदा ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने सराफा व्यावसायिक वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिली. विजयासाठी आवश्यक असलेला ४१२ मतांचा जादुई आकडा पार करण्याएवढी मते दोन्ही उमेदवारांकडे नाहीत. त्यामुळे मतांची जुळवाजुळव करण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे.  या मतदारसंघाचा इतिहास लक्षात घेतल्यास उमेदवाराच्या पक्षाचे अधिकृत संख्याबळ अधिक असतानाही तो उमेदवार विजयी होईल, याची कुठलीही शाश्वती नसते. गेल्या तीन निवडणुकांमध्ये युतीचे उमेदवार म्हणून बाजोरिया यांनी अधिकृत अल्प मतदार असतानाही चमत्कारिक विजय मिळवले आहेत. आघाडीचे मतदार फुटले होते. आता ते स्वत: महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अंतर्गत गटबाजी व मतभेद आहेत. त्याचा परिणाम या निवडणुकीवर होऊ नये, याची काळली बाजोरिया यांना घ्यावी लागणार आहे. महाविकास आघाडीचे मतदार एकसंध ठेवण्यासह वंचित, अपक्ष व इतर मतदार आपल्याकडे वळवण्यावर बाजोरियांचा भर राहील. बाजोरियांना या निवडणुकीचे ‘गणित’ अवगत असल्याने त्यांना ते फारसे कठीण जाणार नसल्याचा सूर राजकीय वर्तुळात उमटत आहे.

भाजप उमेदवार वसंत खंडेलवाल हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांना उमेदवारी देण्यामागे गडकरींचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जाते. आता खंडेलवालांना विजयी करण्यासाठी गडकरी आपले राजकीय कसब पणाला लावणार का, हा खरा प्रश्न आहे. पश्चिाम वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपच्या नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत. त्या सर्व नेत्यांना एकत्रित ठेवत मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी खंडेलवाल यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भाजपने सूक्ष्म नियोजनावर भर दिला असून आपले गठ्ठा मतदान कायम राखण्याचे त्यांचे जोरदार प्रयत्न आहेत. आपले मतदार फुटू नये म्हणून भाजपकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. भाजपकडे २४० च्या जवळपास मतदार आहेत. विजयासाठी त्यांना आणखी १७५ मतदारांची गरज भासेल. वंचित आघाडी व अपक्ष मतदार आपल्याकडे ओढण्याच्या दृष्टीने दोन्ही उमेदवारांच्या हालचाली सुरू आहेत.

तीन जिल्ह्यांत मतदार

या निवडणुकीकडे केंद्र व राज्य पातळीवरून लक्ष लागले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व भाजप या दोन्ही बाजूच्या नेत्यांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची ठरणार आहे. एकूण ८२२ मतदार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मतदार बुलढाणा जिल्ह्यात ३६७, अकोला जिल्ह्यात २८७, तर वाशीम जिल्ह्यात १६८ मतदार आहेत. या निवडणुकीतील घोडेबाजार हे उघड गुपित आहे. त्यामुळे मतदारांना ‘अर्थ’ लाभाची प्रतीक्षा आहे. उमेदवार नेमका ‘दर’ काय ठरवतात व आपल्याला किती ‘लक्ष्मीदर्शन’ होते, याची उत्सुकता मतदारांना लागली आहे.  मतदानाच्या अंतिम क्षणापर्यंत मतदारांना आपल्याकडे ओढण्यासठी उमेदवारांमध्ये चढाओढ राहणार आहे.

वंचितची भूमिका पुन्हा ‘सदसद्विवेकबुद्धी’?

विधान परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व अपक्षांची भूमिका निर्णायक स्थितीत आहे. त्यामुळे त्यांचे वजन आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दोन्ही उमेदवारांचे सखोल प्रयत्न आहेत. मात्र, वंचित आघाडीचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यात आहे. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर ९ डिसेंबरला पक्षाची भूमिका जाहीर करू शकतात. राज्यातील व अकोला जिल्हा परिषदेतील राजकारण लक्षात घेता वंचित आघाडी कुठल्याही उमेदवाराला उघड र्पांठबा देण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणेच ‘सदसद्विवेकबुद्धी’ने मतदान करण्याचे आदेश अ‍ॅड.आंबेडकर आपल्या मतदारांना देण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legislative council akola buldhana washim legislative council election bjp shivsena akp
First published on: 07-12-2021 at 21:05 IST