अमरावती शहरातील वडाळी आणि छत्री तलावालगतच्या जंगलामध्ये पाच बिबटय़ांचे अस्तित्व आढळून आले असून शहराच्या सीमेवरील गावांमध्ये या बिबटय़ाचा वावर वाढल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या आठवडय़ात दोन बिबटय़ांनी भानखेडा गावाजवळ एका म्हशीची शिकार केल्याची घटना घडली. वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपमधून ही बाब निदर्शनास आली होती.
पोहरा जंगलातून वन्यप्राणी भक्ष्य आणि पिण्याच्या पाण्याच्या शोधात शहराकडे धाव घेण्याची लक्षात घेऊन वन विभागाने वन कर्मचाऱ्यांचे एक पथक या परिसरात देखरेखीसाठी नियुक्त केले आहे. वन्यप्राण्यांना पिटाळून लावण्यासाठी शस्त्रे आणि उपकरणे त्यांना उपलब्ध करून दिली आहेत. या भागात पाच बिबटय़ांचा वावर असल्याची पुष्टी वनविभागानेही केली आहे. भानखेडा येथील रहिवासी प्रेमकुमार यादव यांची म्हैस बिबटय़ांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याचे लक्षात आल्यानंतर गावात दहशतीचे वातावरण पसरले. बिबटय़ांनी म्हशीवर हल्ला करून तिला एका शेतात फरफटत नेले. जंगलात वनविभागाने कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. एका कॅमेरातून शिकारीची ही घटना कैद झाली. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला वनविभागाच्या वडाळी रोपवाटिकेतील पिंजऱ्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या दोन नर बिबटय़ांकडे एक मादी बिबट आकर्षिक झाल्याचेही निदर्शनास आले होते. मादी बिबटय़ाचा या भागात आठवडाभर वावर होता.
काही महिन्यांपूर्वी पोहरा जंगलात अनेक गावकऱ्यांना बिबटय़ाची पिलेही दिसली होती. शहरालगतच्या या जंगलात अनेक वन्यप्राणी आहेत. काही वर्षांपूर्वी एक-दोन बिबटय़ांचे दर्शन या भागातून जाणाऱ्या लोकांना झाले, पण आतापर्यंत पाच बिबटय़ांचे अस्तित्व स्पष्टपणे आढळून आलेले आहे.
दोन बिबटय़ांचे अस्तित्व कॅमेरातूनच दिसून आले आहे, तर वन कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणांहून तीन बिबटय़ांचा वावर आढळून आला आहे. या बिबटय़ांच्या हल्ल्यात अलीकडच्या काळात मनुष्यहानी झालेली नसली, तरी पाळीव जनावरे या बिबटय़ांनी फस्त केले आहेत. बिबटय़ांचे रानससे, कुत्री हे आवडते भक्ष्य आहे. मालखेडच्या जंगलात बिबटय़ाने काही दिवसांपूर्वी एका हरिणाचीही शिकार केली होती. जंगलातील पाणवठय़ांमधील पाणी आटल्यानंतर वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडतात. शिकारीसाठीही त्यांना बाहेर पडावे लागते. अशा वेळी मनुष्य-वन्यप्राण्यांच्या संघर्षांच्या घटना घडतात.
उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात बिबटे शहरात शिरण्याचा धोका आहे. जंगलालगतच्या गावामध्ये मात्र गावकरी आतापासूनच धास्तावले आहेत. नागरिकांनी भयभीत होण्याचे कारण नसले, तरी दक्षता बाळगायला हवी, असे वनविभागाने म्हटले आहे.