-विजय पाटील

“राष्ट्रीयस्तरावरील यंत्रणांकडून राज्यात कारवाया होत असल्यातरी त्यातून शरद पवार यांच्या कुटुंबाला अथवा कुणालातरी त्रास देण्याचा उद्देश नाही. या यंत्रणा पूर्णत: स्वतंत्र असून, त्यांच्या कारवाईंमध्ये केंद सरकारच्या हस्तक्षेपाचा संबंधच येत नसल्याचं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच, “ अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाईल, त्यांना तुरूंगात पाठवू या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अल्पसंख्याक कल्याणमंत्री नवाब मलिक यांच्या इशाऱ्याबाबत आठवलेंनी वानखेडेंची नोकरी की, मलिकांचे मंत्रिपद जातयं हे पाहुया असे आव्हानच दिले.

सुशांत रजपूत याच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील अंमली पदार्थाच्या मोठ्या प्रमाणातील सेवनाचा मुद्दा समोर आला. आर्यन खानवरील कारवाईत बिलकुल पक्षपातीपणा नसून, त्याच्या विरोधात भक्कम पुरावे असल्यानेच न्यायालय त्याला जामीन देत नसावे. सक्त वसूली संचालनालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या छापेमारीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई ही होणारच असल्याचे आठवले म्हणाले.

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाबाबत –

शेतक-यांच्या म्हणण्यानुसार कृषी कायदे मागे घेतले तर आंदोलनांमधून अनेक कायदे मागे घेण्याची मागणी होईल. त्यामुळे कायद्याला अर्थच राहणार नाही. आम्हाला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांबाबत सहानुभूती असून, केंद्र सरकार चर्चेस तयार आहे. तरी, याचा फायदा आंदोलकांनी करून घ्यावा. केंद्राच्या कृषी कायद्याने कुणाच्याही जमिनी गहाण राहणार नाहीत. शेतक-यांचा तोटा होणार नसल्याचा दावा आठवले यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसेला सोबत घेतल्यास भाजपाला फटका बसेल –

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान न्यायाचे स्वप्न पाहिले. त्यानुसारच आमची वाटचाल आहे. सक्षम, कृतिशील संघटना म्हणून आमच्या ‘रिपाइं’ची प्रतिमा आहे. आज ब्राह्मण, मराठा यासह अनेक समाजातील लोक ‘रिपाइं’त सहभागी होत आहेत. महापालिकांच्या येऊ घातलेल्या निवडणुकात ‘रिपाइं’चे भाजपाच्या सोबतीचे धोरण आहे. मात्र, मनसेला सोबत घेतल्यास भाजपाला फटका बसेल असे भाकीत करताना, मुंबईत भाजपाला दलित मतांची साथ मिळाल्यास शंभरावर जागा जिंकणे सहज शक्य असल्याचा विश्वास आठवले यांनी दिला.