नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येथे नुकताच शिवसेनेची बूथ प्रमुख आणि कार्यकर्ता, पदाधिकारी यांचा मेळावा पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तयारीला वेग देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या निवडणुका महायुती म्हणून लढण्याचे जाहीर केेले. त्यांच्या पाठोपाठ आता शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत येथे भाजप उत्तर महाराष्ट्रची बैठक होणार आहे. नाशिक महानगरपालिकेसह अनेक ठिकाणी स्वबळावर लढण्याची भाजपने तयारी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मित्रपक्षांना बरोबर घेतले जाईल की नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

रविवारी शिंदे गटाच्या बूथ प्रमुख कार्यशाळा आणि कार्यकर्ता, पदाधिकारी मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करण्यासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी काय करावयास हवे, याविषयी मार्गदर्शन केले होते. निवडणुका कशा जिंकायच्या हे आम्हांला माहिती आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करा, असा कानमंत्र त्यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकहाती वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. यामुळे शिंदे गटाची कोंडी झाली आहे. मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यानंतर लगेचच भाजपतर्फे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता पंचवटीतील स्वामी नारायण सभागृहात ही बैठक होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री, आमदार, खासदार आणि जिल्हानिहाय प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या निवडणुका महायुतीत लढण्याच्या केलेल्या घोषणेला भाजपकडून कसा प्रतिसाद मिळतो, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. कारण, नाशिक महापालिकेसह अनेक ठिकाणी भाजपने एकहाती वर्चस्व राखण्याची तयारी केली आहे. गतवेळी नाशिक महापालिकेत ६६ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. तेव्हा एकसंघ शिवसेना विरोधी बाकावर होती. आगामी निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. त्यासाठी मागील काही महिन्यांत विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांना आपल्याकडे वळवले.