सातारा: महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव परिसरात वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक स्टॉलधारकांच्या पुनर्वसनाची मागणी करून देखील त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटत नसल्याने आपण स्वतः येत्या २ मे ला महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाच्या उद्घाटना दिवशी २८ स्टॉलधारक कुटुंबीयांसह वेण्णा तलावात जलसमाधी घेणार असल्याची माहिती माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वेण्णालेक परिसरात वर्षानुवर्षे स्थानिकांचे २८ खाद्यपदार्थांचे स्टॉल्स होते. तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जून २०२३ मध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिल्यानंतर वनविभागाने हे स्टॉल्स हटवले होते.
माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली होती. यावर कार्यवाही होत नसल्याने त्यानंतर थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने सातारा जिल्हाधिकाऱ्यांना या निवेदनावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या स्टॉलधारकांचे वेण्णा लेक येथेच पुनर्वसन करण्याचा निर्णय गतवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये दिला. मात्र अद्यापही यावर कार्यवाही झाली नाही, असे सांगून कुमार शिंदे म्हणाले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची बदली झाली. त्यानंतर देखील जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना भेटून आम्ही याप्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. मात्र कोणताही मार्ग निघाला नसल्याचे कुमार शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.अतिक्रमण विरोधी कारवाई करत हे स्टॉल हटवले होते. या कारवाईमुळे बाधित झालेल्या २८ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातगाडी व्यावसायिकांना न्याय न मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे कुमार शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. येत्या २ मे रोजी महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाच्या उद्घाटना दिवशी २८ स्टॉलधारक कुटुंबीयांसह वेण्णा तलावात जलसमाधी घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अस्लम अबू डांगे, प्रशांत आखाडे, हेमंत साळवी यांच्यासह स्टॉलधारक उपास्थित होते.