करोनाचा आणि ऑक्सिजनचा थेट संबंध असल्याचं दिसून आलं आहे. मग शरीरामधील ऑक्सिजनचं प्रमाण सुधारण्यासाठी आपण आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या नैसर्गिक पद्धतीचा वापर का करत नाही असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय. लोकसत्ताने आयोजित केलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी क्वारंटाइन वगैरे शब्द आता आले असले तरी यापूर्वीच्या साथीच्या रोगांच्या कालावधीमध्येही संसर्ग झाल्यास एकटं राहण्याला प्राधान्य दिलं जायचं अशी आठवण करुन दिली. आधीपासून उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक मार्गांचाही करोनासंदर्भातील परिस्थितीमध्ये उत्तम आरोग्यासाठी वापर केला पाहिजे असं आंबेडकर म्हणाले.

आधीच्या काळी कॉलरा, कांजण्या, गोवर यासारख्या साथी आपण पाहिल्या आहेत. आज आपण एकट राहण्याला क्वारंटाइन म्हणतो. आधी आपण साथीच्या रोगांच्या कालावधीमध्ये एखाद्याला संसर्ग झाल्यास तू एकटा राहा म्हणायचो. दुसऱ्याला होऊ नये अशी काळजी तेव्हाही घेतली जायची. आज आपण सॅनिटाइज करायला रसायने शिंपडतो, पूर्वी आपण कडूलिंबाची पान वाररायचो. आधी घरात कडूलिंबाची पान आणून जाळली जायची त्याचा धूर केला जायचा. हा नौसर्गिक पद्धतीचा जो भाग आहे त्याचा सध्या का वापर का केला जात नाहीय?, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. करोना परिस्थितीच्या व्यवस्थापनासंदर्भात काम करणाऱ्यांनी या गोष्टींकडेही थोडं लक्ष दिलं पाहिजे अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.

करोना झाल्यानंतर आम्ही काय करु हे सांगितलं जात आहे. मात्र तो होणार नाही याची काळजी घेतली जात नाहीय, असं आंबेडकर म्हणाले. त्यांनी बाबा रामदेव, श्री. श्री रवी शंकर यांचा उल्लेख करत त्यांच्या अभ्यासामधून ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासंदर्भातील व्यायाम केले पाहिजेत असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

करोनामुळे आलेल्या नवीन नवीन नियमांमध्ये ह्युमन टच गेलाय, भेटी गाठी कमी झाल्यात. पण आजार येणार आणि जाणार मात्र आपल्यामधील ह्युमन टच आणि भावना कायम राहिल्या पाहिजेत, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.