सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर, आठ दिवसांपासून पूरपरिस्थिती गंभीर असल्यामुळे माण तालुका वगळून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली होती. मात्र, सुट्टी जाहीर करणाऱ्यात आल्याचा उल्लेख असलेल्या जिल्हा अधिकारी श्वेता सिंघल यांच्या पत्रात अज्ञाताकडून फेरबदल करण्यात आला व यानंतर सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. या प्रकरामुळे आता पत्रात फेरबदल करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल सोमवारपासून त्यांच्या सही व शिक्क्यासह शाळा, महाविद्यालयांच्या सुट्टीबाबतचे पत्र प्रसिद्ध करत आहेत. त्यानुसार माण तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असायची. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा, जावळी, महाबळेश्वर, वाई, कराड व पाटण या तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचे आदेश काढले होते. तर पावसाचा जोर कमी झाल्याने कोरेगाव, फलटण, खंडाळा, माण व खटाव या तालुक्यांना सुट्टीच्या आदेशातून वगळण्यात आले होते. मात्र अज्ञाताकडून खोडसाळपणा करून मागील दोन दिवसांच्या पत्रात फेरबदल करण्यात आला. त्यात (गुरुवार दि ९) आणि बुधवार (दि ८) असे नमूद करून माण वगळता अन्य सर्व तालुक्यांना व शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकाराची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे .

पाच तालुक्यातील शाळा,महाविद्यालयांना सुट्टी –
सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यात अजूनही कायम असलेली आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन विशेषत: पश्चिमेकडील अति पर्जन्यमान असलेल्या महाबळेश्वर, जावळी, पाटण, कराड आणि वाई या ५ तालुक्यातील सर्व शाळा तसेच महाविद्यालये यांना शुक्रवार, दि. ९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सुट्टी जाहीर केली आहे. इतर तालुके सातारा, खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव येथील शाळा व महाविद्यालये सुरु राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.