Udayanraje Bhosale on Satara Nagarpalika Election : सातारा जिल्ह्यात पालिका निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. साताऱ्यातील मतदार नऊ पालिका आणि एका नगरपंचायतीतील १५५ प्रभागांतील २३३ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत. दरम्यान, सातारा नगरपालिका निवडणुकीत महायुतीची भूमिका कशी असेल? महायुतीतले पक्ष एकत्र निवडणूक लढवणार का? खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे पदाधिकारी एकत्र येणार का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सगळ्यावर उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
सातारा नगपालिका निवडणुकीबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांची आज साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे, मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम उपस्थित होते.
या बैठकीनंतर उदयनराजे भोसलेंसमोर प्रसारमाध्यमांनी मनोमिलनाचा विषय छेडला. यावर उदयनराजे भोसले म्हणाले, “माझी खूप दिवसांपासून नगराध्यक्ष होण्याची इच्छा होती. त्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा देऊन नगराध्यक्षपदासाठी उभा राहतो.” तर, मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “निवडणुकीबाबत जो काही निर्णय होईल तो सातारकरांच्या हितासाठी व भापाच्या माध्यमातून होईल.”
माझी नगराध्यक्ष होण्याची फार पूर्वीपासूनची इच्छा : उदयनराजे भोसले
उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले, “माझी साताऱ्याचा नगराध्यक्ष होण्याची फार पूर्वीपासूनची इच्छा होती. त्यामुळे आता मी खासदारकीचा राजीनामा देऊन नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभा राहतो.” उदयनराजेंनी अगदी गमतीत हे वक्तव्य केलं आणि त्यामुळे सर्वांमध्ये एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
बैठकीत काय चर्चा झाली?
दरम्यान, सातारा नगरपालिकेची निवडणूक भाजपाच्या चिन्हावर खासदार उदयनराजेंचे पदधिकारी आणि माझे पदाधिकारी असा सगळ्यांचा एकत्रित विचार करून एकत्रित लढवणार असल्याचं मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. ते म्हणाले, “नगरपालिकेच्या निवडणुकीत कसं पुढे जायचं, काय काय नियोजन करायचं आणि पक्षाच्या सूचना याबबद्दल आजच्या बैठकीत चर्चा झाली. येत्या पाच सहा दिवसांत पुढचे निर्णय घेतले जातील. आपापल्या मतदारसंघात, जिथे निवडणुका आहेत तिथे नियोजन केलं जाईल.”
“आता आम्हाला तुमच्यासाठी धावपळ करावी लागेल”
मंत्री शिवेंद्रसिंहराजे सर्व पदाधिकाऱ्यांना म्हणाले, “सातारा भाजपामध्ये नवा जुना असा कोणताही वाद नाही. पक्ष संघटना म्हणून आपण सगळेच एक आहोत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तुम्ही आमच्यासाठी काम केलं, आम्हाला निवडून दिलं, आता तुमची निवडणूक आहे. आता आम्हाला तुमच्यासाठी काम करायचं आहे, आता सगळ्या लोकप्रतिनिधींना धावपळ करावी लागेल.”
