सोलापुरातील माढा लोकसभा मतदारासंघातून विजयी झालेले भाजपाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार होताच वादग्रस्त वक्तव्य करत वाद निर्माण केला आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर यांच्यावर टीका करताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जीभ घसरली असून रामराजे बिनलग्नाची औलाद असं म्हटलं आहे.
रणजितसिंह नाईक-निंबाळकर माढ्यातून तब्बल ८५ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयानिमित्त फलटण येथे विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं की, ‘माझा डीएनए तपासा, ९६ पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील. मात्र रामराजे बिनलग्नाची औलाद आहेत.
‘मी ओरिजनल नाईक-निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासला तर या रणजितसिंहाच्या ९६ पिढ्या नाईक-निंबाळकरच निघतील. परंतु तुमचं काय? तुम्ही स्वत:ला नाईक-निंबाळकर म्हणवता, आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगता? तुमच्या आईचं आणि वडिलाचं लग्न झालं असेल? त्या लग्नाचा दाखला मला दिला तर त्याला एक हजाराचं बक्षिस देईन’, असं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर एवढ्यावरच थांबले नाहीत. पुढे ते म्हणाले की, ‘रामराजे ही बिनालग्नाची औलाद आहे, हा इतिहास आहे. रामराजेंच्या वडिलांना मालोजीराजेंनी घरात घेतलं नव्हतं. त्यामुळे मला वाईट बोलायचं नव्हतं, परंतु बोलावं लागलं’.