सांगली : जिल्हा परिषदेतील १५४ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन व भत्ते प्रलंबित असून, ते दिवाळीपर्यंत मिळावेत, अन्यथा प्रशासकीय कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा ‘मॅग्मो संघटनेच्या’वतीने देण्यात आला.

मॅग्मो संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन व भत्ते मिळालेले नाहीत. यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. काढण्यात आलेल्या कर्जाचे हप्तेही थकीत असून, याचा मानसिक, कौटुंबिक स्वास्थ्यावर परिणाम होत आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन व भत्ते नियमित मिळावेत, यासाठी महिन्याच्या पाच तारखेपर्यंत तरतूद करण्यात यावी, यासाठी खास निधीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मागील दोन महिन्यांचे वेतन व भत्ते दिवाळीपूर्वी मिळावेत, अन्यथा प्रशासकीय कामकाजावर बहिष्कार घालण्यात येईल. तथापि, अत्यावश्यक वैद्यकीय सेवेवर याचा परिणाम होऊ दिला जाणार नाही, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

यावेळी शिष्टमंडळात डॉ. प्रवीण पाटील, डॉ. अभिजित सांगोलकर, डॉ. विनय कारंडे, डॉ. अभिषेक शिरोळे, डॉ. विजय सूर्यवंशी, डॉ. शुभम खोदांडे, डॉ. शशिकांत पाटील व डॉ. प्रमोद भोसले आदींचा समावेश होता.