मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवरून शिवसेना(ठाकरे गट) आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्यात वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. या मुद्य्यावरून आदित्य ठाकरे यांनी काल राज्य सरकारवर आरोप केल्यानंतर आज भाजपा नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेवर टीका केली आहे.

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले, “आदित्य ठाकरे आणि त्यांची युवासेना यांच्या रेसकोर्सबाबतच्या प्रतिक्रिया याचं वर्णन जर कमी शब्दात करायचं झालं, तर वरीती मागून घोडे, घोडेबाजार आणि घोडाशर्यतीनंतर आदित्यंची शिवसेना असा प्रकार आहे. २०१३ मध्ये करार संपला महापालिकेत सत्तेत कोणं होतं? आदित्य ठाकरे तुम्ही. २०१९ ते २०२२ पर्यंत राज्य सरकारची जमीन असेल, तर सरकारमध्ये कोणं होतं? आदित्य ठाकरे तुम्ही. महापालिकेत २५ वर्षे तुम्हाला काही करता आलं नाही, अडीच वर्षे राज्याच्या सत्तेत असून मुहूर्तमेढ करता आली नाही. त्यामुळे वरातीमागून घोडे हे घोडा शर्यतीच्या मैदानाच्याबाबतीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची प्रतिक्रिया आहे.”

हेही वाचा -Love Jihad : हिंदू मुली ‘या’ लोकांना खेळाचं साधन वाटायला लागल्या का? – आशिष शेलारांचा संतप्त सवाल!

याचबरोबर, “भाजपाची भूमिका स्पष्ट आहे, महालक्ष्मीच्या रेसकोर्सवर मुंबईकरांचा अधिकार आहे. तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नाही आणि आदित्य ठाकरेंच्या पेंग्विन सेनेचा तर अजिबातच नाही. मुंबईकरांचा त्यावर अधिकार आहे. त्या ठिकाणी कार्बन न्युट्रल आंतरराष्ट्रीय स्वरुपाला शोभेल असं सौंदर्यशास्त्र सुद्धा आणि अशा पद्धतीची सजावट असलेलं उद्यान तिथे झालं पाहिजे. तेव्हा व्हायलाच हवं आणि तशी राज्य सरकारची भूमिका आहे, त्याचं आम्ही अभिनंदन करतोय.” असंही आशिष शेलार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Mahalakshmi Racecourse : “खोके सरकारला आता रेसकोर्स विकायचाय; मुंबईकरांच्या हक्काची इंच इंच जमीन…” आदित्य ठाकरेंचं विधान!

याशिवाय, “रेसकोर्स इकडून कुठे स्थलांतरित करायचा, महापालिकेने प्रस्ताव द्यावा. त्यावर आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ. पण त्यातही प्रस्ताव जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसारखा, मेट्रोच्या काळात कांजूरमार्गच्या जागेवर कारशेड म्हणजे खासगी मालकाच्या जागेवर कारशेड. असं खासगी मालकाच्या जागेवर जर रेसकोर्स प्रस्तावित केलं आणि खासगी मालकाचा फायदा करून देणार असतील, तर त्याहीवेळा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आम्ही कांजुरमार्गला विरोध केला होता. आताही महापालिकेला खासगी बिल्डरांना मदत केली तर विरोध करू.” असं म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली.

आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारेही आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “मुंबई महापालिकेचा वैयक्तिक पिगी बँकेसारखा वापर केल्यानंतर आणि मुंबईतील कंत्राटदार माफियांद्वारे २५ वर्षे लूट केल्यानंतर आता युवा नेते मोकळ्या जागेबाबत बोलत आहेत. लंडन आय आणि फॅन्सी प्रकल्पासाठी वांद्रे सीलिंक येथील मोक्याची मोकळी जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर युवा नेत्यांना मोकळ्या जागेची आठवण झाली, वा!” असं शेलार म्हणाले आहेत.

याचबरोबर “उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महापालिकेने रेसकोर्सचा भाडेकरार २०१३ मध्ये संपुष्टात येऊनही प्रलंबित का ठेवला? काय तडजोड होती? ….पब/पार्टी लॉबी?. रेसकोर्स राज्य सरकार आणि बीएमसी यांच्या संयुक्त मालकीचा आहे. आमची बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा सरकार मुंबईकरांच्या हिताचा निर्णय घेईल, कांजुर मेट्रो डेपो जमीन प्रकरणात उद्धव ठाकरे सरकारने खासगी कंत्राटदाराच्या हिताचा निर्णय घेतला होता, तसा नाही.” असंही आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते? –

“खोके सरकारला आता रेसकोर्स विकायचाय! समजलेल्या माहितीप्रमाणे वरळी डेअरी बिल्डर्सच्या घश्यात घालण्यासोबतच रेसकोर्सची जागाही व्यावसायिक हितसंबंधांसाठी देण्याचा प्रयत्न सुरु आहे.” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

मुंबईमधील महालक्ष्मी येथील रेसकोर्सचा भाडेकरार १० वर्षांपूर्वी म्हणजेच २०१३ मध्ये संपुष्टात आला आहे. मागीस दहा वर्षांत कराराचे नुतनीकरण न झाल्यामुळे पालिकेचा तब्बल ५ कोटींहून अधिकचा महसूल बुडाला आहे. तरी हा महसूल व्याजासहीत वसूल करण्यात येणार आहे. तसे प्रतिज्ञापत्रही रेसकोर्स व्यवस्थापनाकडून घेण्यात येणार आहे.