कोल्हापूर : गुलाबी रिक्षा मिळाळ्याने महिलांना स्वावलंबनाची शाश्वती मिळाली आहे. या योजनेमुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल. या माध्यमातून सामान्य महिलांना उन्नतीचा मार्ग गवसला आहे, असे मत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी येथे व्यक्त केले. महिला व बालविकास विभागाच्या वतीने येथे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा व रुपे कार्डचे वितरण करण्यात आले, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार राजेश पाटील, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कायनेटिक ग्रीनच्या संस्थापिका, मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी, कार्यकारी संचालक रितेश मंत्री, जोयेल जॉर्ज, अग्रदीप रॉय उपस्थित होते.

१० हजार पर्यावरणपूरक रिक्षा

या कार्यक्रमात महिला लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षाचा चौथा ताफा सुपूर्द करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने पिंक ई-रिक्षा योजना सुरू केली असून पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर या ८ जिल्ह्यांमध्ये १० हजार पर्यावरणपूरक कायनेटिक ग्रीन इलेक्ट्रिक तीनचाकी रिक्षा तैनात केली जाणार आहे. आठ सहभागी जिल्ह्यांमध्ये कायनेटिक ग्रीन १५०० चार्जर कार्यान्वित करणार आहे. यामुळे महिला सक्षमीकरण आणि हरित पर्यावरणाला चालना मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.

योजनेचे प्रारूप

या योजनेअंतर्गत, महाराष्‍ट्र सरकार प्रत्येक ई-रिक्षाच्या किमतीवर २० टक्‍के अनुदान देईल, तर लाभार्थी १० टक्‍के रक्‍कम डाउन पेमेंट म्हणून देतील. उर्वरित ७० टक्‍के रक्‍कम प्रमुख वित्तीय भागीदारांनी दिलेल्या बँक कर्जाद्वारे दिली जाईल, ज्यामधून सुलभ आणि कमी व्याजदरामध्‍ये आर्थिक साह्याची खात्री मिळेल. याव्यतिरिक्‍त, महाराष्‍ट्र सरकार व कायनेटिक ग्रीन लाभार्थ्यांशी संलग्‍न होण्‍यासाठी आणि बचत गटासोबत सहयोग करण्यासाठी विविध ठिकाणी प्रत्यक्ष उपक्रम राबवतील. त्यांना अधिक पाठिंबा देण्यासाठी कायनेटिक ग्रीन मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण देईल, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यास मदत करेल आणि उत्तम चार्जिंग पायाभूत सुविधा उभारेल. 

वेईकल आणि बॅटरी दोन्ही पाच वर्षांच्या वॉरंटीसह येतील, सर्व नियतकालिक आणि प्रतिबंधात्मक देखभाल सेवांचा समावेश असलेला व्यापक वार्षिक देखभाल करार (एएमसी) असेल, ज्यामध्ये पाच वर्षांसाठी प्रत्येक तिमाहीत एक मोफत सेवा समाविष्‍ट असेल.

कायनेटिक ग्रीन महाराष्‍ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि विविध राइड-हेलिंग सेवा प्लॅटफॉर्मसोबत सक्रियपणे धोरणात्मक सहयोग करत आहे. हे सहकार्य प्रवाशांना पहिल्या आणि शेवटच्या मैलाच्या कनेक्टिव्हिटीचे महत्त्वाचे पर्याय देण्यासाठी करण्‍यात आले आहे.