अलिबाग: इर्शाळवाडी येथील शोध व बचाव कार्य थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मृतदेहांची विघटन सुरु झाल्याने बचाव पथके आणि आपदग्रस्तांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. शोध व बचाव कार्या दरम्यान एकूण २७ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. ५७ जण अद्यापही बेपत्ता आहेत, त्यांना मृत घोषीत केले जाणार असल्याची माहीती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

हेही वाचा >>> साताऱ्यातील महाबळेश्वर व जोर येथे विक्रमी पावसाची नोंद; पावसाची संततधार सुरूच

खालापूर तालुक्यातील इरशाळवाडीवर १९ जुलैला रात्री साडे अकराच्या सुमारास दरड कोसळली होती. ज्यात वाडीतील ३५ घरे दरडीखाली गाढली गेली होती. २० तारखेला पहाटेपासून मदत व बचाव कार्य सुरु होते. पहिल्या दिवशी १६ दुसऱ्यादिवशी ६ तिसऱ्या दिवशी ५ असे एकूण २७ मृतदेह बचाव पथकांनी बाहेर काढले. चौथ्या दिवशी एकही मृतदेह सापडला नाही. शुक्रवारी जे मृतदेह सापडले त्यांचे विघटन झाल्याचे दिसून आले होते. या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही पसरली होती. त्यामुळे शनिवारी संध्याकाळनंतर शोधकार्य थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री उदय सामंत यांनी बचाव पथके, प्रशासकीय यंत्रणा आणि मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा केली यानंतर हा निर्णय घेण्यात आला. इरशाळवाडीची लोकसंख्या २२८ होती, त्यातील ५७ जण अजूनही बेपत्ता आहेत. शोध मोहीमे दरम्यान २७ मृतदेह सापडले आहेत. तर १४४ जण सध्या निवारा केंद्रात आहेत. त्यामळे जे ५७ जण बेपत्ता आहेत, त्यांना मृत घोषित करण्या संदर्भातील प्रस्ताव राज्यसरकारकडे पाठविला जाणार आहे. राज्यसरकारच्या मंजूरीनंतर बेपत्ता ५७ जणांना मृत घोषीत केले जाणार आहे.