राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पहिल्या सत्रामध्येच पहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगळुरुमध्ये विटंबना झाल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक कनेक्शनवरुन भाष्य करताना शिवसेने आमदार सुनील प्रभू यांनी राज्याच्या पार्यावरण मंत्र्यांनाही कर्नाटकमधून धमक्या आल्या होत्या अशी खळबळजनक माहिती सभागृहाला दिली. तसेच पुढे बोलताना कर्नाटकमध्ये भाजपाचं सरकार आहे असं प्रभू म्हणाले. यावरुन फडणवीस यांनी आक्षेप घेतला.प्रभू हे या प्रकरणाला राजकीय वळण देऊ पाहत असल्याचं फडणवीस म्हणाले. इतकचं नाही तर फडणवीस यांनी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आपण बोलण्यास तयार असल्याचा शब्दही सभागृहाला दिला.

प्रभू नक्की काय म्हणाले?
“राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे धमकी देण्यात आली. मुंबई पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातू अटक केली आहे. जो आरोपी कर्नाटकात सापडला त्यावरुन अनेक तर्कवितर्क सगळ्यांच्या मनात येऊ शकतात. याआधी दाभोलकर, पानसरे यांची हत्या करणाऱ्यारे कर्नाटकशी संबंधित होते. तेव्हापासून कर्नाटकमध्ये भाजपाचे सरकार आहे म्हणून की काय यांच्यामागे कोणती संस्था आहे याची माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकारची दिली जाणारी धमकी आणि आरोपी यांचे सगळ्यांचे संबंध कर्नाटकाशी का आहेत याची माहिती मिळणे आवश्यक आहे. आदित्य ठाकरेंना धमकी देणारा आरोपी हा देखील कर्नाटकातील असल्याने हे जाणीवपूर्वक केलेल षडयंत्र आहे का? जर असे असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे,” असं प्रभू यांनी म्हटलं.

फडणवीस काय म्हणाले?
“सुनील प्रभु हे या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. सन्मानिय आदित्य ठाकरे यांना धमकी आली हे निषेधार्थ आहे. आरोपी कोणत्याही राज्यातील असो त्याला गजाआड करणं गरजेचं आहे,” असं सुनिल प्रभू यांच्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> अनिल परब विरुद्ध नितेश राणे… जागेवरुन विधानसभेच्या सभागृहात वाद, फडणवीसांना करावी लागली मध्यस्थी

फडणवीसांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया
फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणासंदर्भात आपलं मत मांडलं. “महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना धमकी आलीय हे केवळ महाराष्ट्रातल्या पोलिसांनी शोधलंच पाहिजे पण कर्नाटक पोलिसांनी देखील मदत करणे गरजेचे आहे,” असं भुजबळ म्हणाले.

फडणवीस म्हणाले मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो पण…
भुजबळ यांनी हे मत व्यक्त केल्यानंतर त्यावर फडणवीस यांनी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करण्याची ऑफर दिली. “कर्नाटकचे पोलीस जर मदत करत नसतील तर मी स्वतः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याशी बोलेन पण राजकीय वळण देऊ नये,” असं फडणवीस म्हणाले.

गृहमंत्र्यांचं निवेदन…
आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीसंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निवेदन केलं. “आरोपी कर्नाटकमध्ये असल्याने आपलं पथक कर्नाटकला रवाना झाले. या पथकाने आरोपीला अटक केली आहे. या आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे,” अशी माहिती गृहमंत्र्यांनी सभागृहाला दिली.

नक्की वाचा >> “रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार असल्याचं ऐकलंय, ते तरी खरं आहे का सांगा?”

मलाही धमक्या आल्या होत्या : नवाब मलिक</em>
याच प्रकरणावरुन चर्चा सुरु असताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनाही याबाबत निषेध व्यक्त कर एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. “सुशांत सिहंच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करण्याचे कटकरास्थान झाले. या प्रकरणात रिया चक्रवर्तीलाही अटकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुशांतसिंह प्रकरणी तपास करणारे बिहारमधील अधिकारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्यांमधून फिरत होते. सुशांतसिंह राजपूत ट्विटरवर ट्रेण्ड होण्यासाठी तीस लाख रुपये देण्यात आले होते. जेव्हा मी प्रश्न विचारले तेव्हा मलाही धमक्या आल्या. या सर्वांसाठी एक विशेष तपास पथक नेमण्यात यावे,” असे मलिक म्हणाले.