राज्यात राजकारणाचे पडसाद थेट ट्विटरवर उमटताना दिसत आहेत. ट्विटरवरही भाजपा समर्थक आणि महाविकास आघाडीचे समर्थक आमने सामने आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावरुनच आता ट्विटवर दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये हॅशटॅग युद्ध सुरु झालं आहे. महाविकास आघाडीमधील पक्षांनी #महाराष्ट्रद्रोहीBJP हा हॅशटग वापरुन संकटाच्या काळात भाजपा राजकारण करुन राज्याच्या हिताविरोधात पाऊल उचलत असल्याचा टोला लगावला आहे. तर भाजपाच्या समर्थकांनी #MaharashtraBachao हा हॅशटॅग वापरुन राज्यातील करोनासंदर्भातील उपाययोजनांसंदर्भात महाविकास आघाडी अपयशी ठरल्यासंदर्भात टीका करत असल्याचे पहायला मिळत आहे. गुरुवारी (२२ मे २०२०) दुपारी पावणेतीन वाजेपर्यंत #महाराष्ट्रद्रोहीBJP या हॅशटॅगवर ८२ हजार तर #MaharashtraBachao हॅशटॅग वापरुन ४० हजार जाणांनी आपली मत ट्विटरवर व्यक्त केल्याचे ट्विटवरील ट्रेण्डींग टॉपिकमधून स्पष्ट होतं आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करणार्या भाजपसोबत जाऊन आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? याचा विचार जनतेने करावा. हातात काळं घेताना एकदा विचार करावा, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन व्यक्त केलं. “हातात काळं घेताना एकदा तरी विचार करा. आपण अहोरात्र महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवकांचा अपमान तर करत नाही ना?, आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना?” असा विचार जनतेने मनात आणावा अशा आशयाचे ट्विट जयंत पाटील यांनी केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी #महाराष्ट्रद्रोहीBJP हा हॅशटग वापरला होता.
हातात काळं घेताना एकदा तरी विचार करा, आपण अहोरात्र महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवकांचा अपमान तर करत नाही ना!
आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना ? #महाराष्ट्रद्रोहीBJP— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 22, 2020
तर दुसरीकडे काँग्रेसच्या मुख्य ट्विटर हॅण्डलवरुनही हा हॅशटॅग वापरत सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजपा राजकारण करुन पाहत असल्याचा टोला लगावला आहे.
For BJP, politics of power always takes precedence over public interest.#महाराष्ट्रद्रोहीBJP pic.twitter.com/yHDg7iQC0w
— Congress (@INCIndia) May 22, 2020
करोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत भाजपाने आज (शुक्रवार) ‘माझे अंगण, माझे रणांगण‘ आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यभरातील भाजप कार्यकर्ते व नागरिक घराबाहेर फलक, काळे झेंडे फडकवतील, काळ्या फिती लावतील आणि सरकारचा निषेध करीत निदर्शने करतील, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. करोना मुकाबल्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातमोजे, पीपीई किट घालून ‘मातोश्री’ निवास स्थानाबाहेर पडावं, असा टोला प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी लगावला होता.
राज्यात कोरोनाचा पहिला पेशंट सापडला त्याला साठ दिवस झाले तरी कोरोना नियंत्रणात नाही. मुंबईत वैद्यकीय सुविधा कोलमडून पडली आहे. सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. #MaharashtraBachao pic.twitter.com/POcLqGhVg5
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 22, 2020
मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपाचे काही नेत्यांनी महाविकास आघाडीचा विरोध करणारे फलक हाती घेऊन आंदोलन केलं. या आंदोलनाचे फोटो पोस्ट करताना फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर हॅॅण्डलवरुन #MaharashtraBachao हॅशटॅग वापरत महाराष्ट्र बचाव आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन समर्थकांना केलं.
सर्वाधिक रूग्ण, सर्वाधिक मृत्यू!
आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडलेली, शासनाची निष्क्रियता!
राज्य सरकारसोबत सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली.मात्र जनता सहन तरी किती करणार?
आज मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात #MaharashtraBachao आंदोलनात सहभाग घेतला. @BJP4Maharashtra pic.twitter.com/aGjGswKNuj
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 22, 2020
एकंदरितच राज्यावर करोनाचे संकट असताना ट्विटवर मात्र दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांचा विरोध करताना दिसत आहेत. त्यामधून देशभरातील ट्विटरच्या टॉप ट्रेण्डींग टॉपिकमध्ये महाराष्ट्रातील दोन विरोधी भूमिका मांडणारे हशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहेत.