Maharashtra Budget Session 2023-2024: महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. आज चौथ्या दिवशी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर जोरदार टीका केली. रोजगार वाढविणे, महागाई कमी करणे यावर काम करण्याऐवजी भाजपाकडून इतर मुद्दे उपस्थित केले असल्याचे आव्हाड म्हणाले. “योगी आदित्यनाथ यांनी सनातन धर्माचे रक्षण करण्याचे आमचे कर्तव्य आहे”, असे जाहीरपणे सांगितले. या मुद्द्याला हात घालून आव्हाड म्हणाले की, भाजपाला सनातन धर्म परत आणायचा आहे का? असा प्रश्न विचारला. त्यानंतर राम सातपुते यांना उद्देशून केलेल्या एका वक्तव्यामुळे राम सातपुते चांगलेच संतापले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांबाबत आक्षेपार्ह विधान केले आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सनातन धर्म फेकून देशाला संविधान दिले. त्यांचे संविधान बाजूला सारून पुन्हा एकदा सनातन धर्माच्या माध्यमातून अस्पृश्यता आणि जातीव्यवस्था परत आणायची आहे का?” यावेळी आव्हाड यांनी भाजपा आमदार राम सातपुते यांना उद्देशून म्हटले की, तुमचा माळशिरस हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे तो मतदारसंघ राखीव झाला, म्हणूनच तुम्ही इथे आलात. सनातन धर्माचे राज्य असते तर तुम्ही त्या मतदारसंघात चाकरी करत असता, आमदार म्हणून निवडून आले नसतात.
भाजपा आमदार राम सातपुतेंनी केले आक्षेपार्ह विधान
आव्हाड यांच्या टीप्पणीवर भाजपा आमदार राम सातपुते चांगलेच संतापले. त्यांनी आव्हाड यांना उत्तर देत असताना म्हटले की, मी दलित असल्याचा मला अभिमान आहे. होय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच मला आरक्षण दिले. त्यामुळेच मी विधानसभेत आमदार म्हणून निवडून येऊ शकलो. त्याला मला अभिमान आहे. तसेच मला आरक्षण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांनी दिलेले नाही. मी सनातन हिंदू धर्माचा असल्याचा मला अभिमान आहे, असे वक्तव्य केले.
सभागृहातील गोंधळानंतर राम सातपुतेंनी व्यक्त केली दिलगिरी
राम सातपुते यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवार म्हणाले की, सर्वांनाच आपल्या वरिष्ठ नेत्याचा आदर असतो आणि तो असलाच पाहीजे. एकेरी उल्लेख झाला असेल तर ते वक्तव्य फक्त रेकॉर्डवरुन न काढता संबंधित सदस्यांनी माफी मागावी आणि हा विषय संपवावा, अशी सूचना केली. आम्ही जसे समोरच्या वरिष्ठ नेत्यांचा आदर करतो, तसा तो विरोधकांनाही केला पाहीजे. तर भाजपाचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, आव्हाड वारंवार सनातन धर्मावर नकारात्मक बोलत होते. त्यामुळे राम सातपुते यांच्या भावना दुखावल्या असतील. शरद पवार यांचा अपमर्द आम्हाला मान्य नाही. जर ऐकेरी उल्लेख झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
हे वाचा >> “मी नवाब मलिकांना देशद्रोही म्हटलं, इतरांना..” त्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण
राम सातपुते यांनी या गदारोळानंतर सभागृहात आपली भूमिका मांडली. आव्हाड यांनी माझ्याकडे हातवारे करत अतिशय तुच्छतेने माझा उल्लेख केला. त्यामुळे माझ्याकडून चुकून सभागृहाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो, अशी भूमिका मांडली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य रेकॉर्डवरुन काढून टाकण्यात येईल, असे जाहीर केले.