महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यकारभार चालवण्यासाठी एक मुख्यमंत्री आणि दोन-दोन उपमुख्यमंत्री नेमले आहेत. तसेच तीन मोठे आणि अनेक छोट्या पक्षांनी महायुतीत एकत्र येत सरकार बनवलं आहे. भाजपा आणि शिवसेनेचं (शिंदे गट) बहुमतातलं सरकार अस्तित्वात असतानाही जून २०२२ मध्ये महायुतीने ऱाष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला आपल्याबरोबर घेतलं. त्यामुळे महायुती सरकारवर अनेकदा टीकादेखील झाली आहे. तसेच अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने गेल्या दीड वर्षांपासून महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परिणामी शिंदे गट आणि भाजपामधील अनेक इच्छूक आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेसकडून सातत्याने शिंदे गट आणि भाजपामधील इच्छूक आमदारांवर टीका करत आहेत.

आमदार भरत गोगावले, आमदार संजय शिरसाट यांच्यासह शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. हे आमदार मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत आहेत. लोकसभा निवडणुकीला आता काहीच दिवस बाकी आहेत. परंतु, राज्य सरकारने अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचा विचार न केल्याने ही नेतेमंडळी नाराज असल्याच्या चर्चादेखील ऐकायला मिळत आहेत. अजित पवार गट महायुतीत सहभागी झाला आणि त्यांनी उपमुख्यमंत्रिपदासह आठ मंत्रिपदं घेतली आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचा हिरमोड झाला आहे, असा टोला ठाकरे गटातील नेत्यांनी लगावला आहे.

हे ही वाचा >> शिंदे गटाच्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाला धक्का, ‘या’ प्रकरणी बजावली नोटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मंत्रिमंडळातल्या दाटीवाटीवरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीला टोला लगावला आहे. सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन तथा ग्रामविकस मंत्री गिरीश महाजन, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दाटीवाटीने बसून प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे की, “जर केली नसती सुरत गुवाहाटी, तर कशाला झाली असती दाटीवाटी.”