मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ईव्ही ट्रक अर्थात इलेक्ट्रिक ट्रक चालवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रक चालवल्यानंतरची दृश्यं व्हायरल झाली आहेत. चाकणमध्ये ईव्ही ट्रकचं उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ट्रक चालवून पाहिला. अशा १० हजार ट्रक्सची निर्मिती करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ब्लू एनर्जी या कंपनीने या ईव्ही ट्रकची निर्मिती केली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“ब्लू एनर्जीच्या वतीने भारतातला आधुनिक आणि पहिला इलेट्रिक ट्रकचं उद्घाटन करण्यात आलं. या ट्रकमध्ये बॅटरी स्वॅपिंग सुविधा आहे. अत्यंत किफायतशीर किंमतीत हा ट्रक उपलब्ध आहे. यामुळे आपली कार्गो वाहतूक यामध्ये जे प्रदूषण होतं ते संपुष्टात येईल. आपलं परकिय चलन वाचेल. हा ट्रक स्वदेशी बनावटीचा आहे. भारताच्या सगळ्या वातावरणात हा ट्रक चालू शकतो. या ट्रकची बॅटरी चार्जही करता येते आणि रिप्लेस करता येते. साडेचार मिनिटांत बॅटरी बदलता येते. पहिल्या टप्प्यात मुंबई ते पुण्याच्या दरम्यान कॉरिडॉर तयार केला जातो आहे ज्यावर बॅटरी बदलता येईल. ट्रक चार्ज करता येईल. साडेचार मिनिटांत दुसरी बॅटरी ट्रक चालकाला लावता येईल. पेट्रोल किंवा डिझेल भरायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळ लागणार आहे. १० हजार ट्रक निर्माण केले जाणार आहेत. ३० हजार ट्रक निर्मितीचं लक्ष्य त्यांनी ठेवलं आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, दावोस मध्ये आम्ही एमओयू केला होता. तो एमओयू प्रत्यक्षात उतरवण्याचं काम या ठिकाणी झालं आहे. ट्रकच्या क्षेत्रात ब्लू एनर्जी आणि एस. आरने क्रांती घडवली आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ईव्ही ट्रकची वैशिष्ट्ये काय?
१) ईव्ही ट्रकमध्ये बॅटरी बदलण्याची आणि चार्ज करण्याची अशा दोन्ही व्यवस्थआ
२) बॅटरी अवघ्या साडेचार मिनिटात बदलली जाणार
३) कुठल्याही वातावरणात हा ट्रक चालू शकतो या क्षमतेचा ट्रक
४) ब्लू एनर्जीकडून १० हजार ईव्ही ट्रक्सची निर्मिती केली जाणार
५) अत्यंत किफायतशीर किंमतीत ईव्ही ट्रक उपलब्ध होणार
पुण्यातल्या चाकण या ठिकाणी असलेल्या ब्लू एनर्जी मोटर्स या कंपनीने ईव्ही ट्रकची निर्मिती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या ईव्ही ट्रकचं उद्घाटन करण्यात आलं.