उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी साधूंच्या हत्येवरुन चिंता व्यक्त करतताना आम्ही तुमच्यासोबत असल्याचं सांगितलं आहे. सोबतच आमच्याप्रमाणे तुम्हीही कडक कायदेशीर कारवाई तसंच दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, “योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत”.

“ज्याप्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परंतु कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशात दोन साधूंची हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. गावातील मंदिरात मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. उत्तर प्रदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पालघर घटनेचा उल्लेख करत या घटनेला धार्मिक रंग देऊ नये असं आवाहन केलं आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “भयानक ! उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये मंदिरात दोन साधूंची हत्या. मी सर्वांना आवाहन करतो की याला धार्मिक रंग देऊ नये. ज्याप्रकारे काही लोकांनी पालघर प्रकरणात प्रयत्न केला होता”.

पालघरमध्ये चोर असल्याच्या संशयावरुन जमावाने हल्ला करत तिघांची हत्या केली होती. यामधील दोन साधू होते. यानंतर अनेकांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला होता. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत असा कोणताही संबंध नसून राजकारण केलं जाऊ नये अशी विनंती केली होती. सोबतच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अटक करण्यात आलेल्यांमध्ये एकही मुस्लीम नसल्याचं सांगत चुकीचे आरोप केले जात असल्याचं सांगितलं होतं.

आणखी वाचा- उत्तर प्रदेशातील हत्याकांडाचे पालघरसारखे राजकारण नको, संजय राऊत यांनी खडसावलं

बुलंदशहर जिल्ह्यातील पगोना गावातील शिव मंदिरात गेल्या १० वर्षांपासून जगनदास आणि सेवादास हे दोन साधू वास्तव्यास आहे. दोन्ही साधू मंदिरातील धार्मिक विधी करतात. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री मंदिर परिसरात दोघांची हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी गावातील लोक मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणात राजू नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी गावापासून दोन किमी अंतरावरून अटक केली.

आणखी वाचा- तुमची ‘सोनिया सेना’ झाल्यापासून तुमचं हिंदुत्व नकली झालंय… संजय राऊतांना टोला

ग्रामस्थांच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला नशा करण्याचं व्यसन आहे. आरोपीने साधूंचा चिमटा चोरला होता. त्यामुळे साधू आरोपीवर रागावले. त्यातूनच आरोपीनं दोन्ही साधूंची सोमवारी तलवारीनं रात्री हत्या केली. आरोपीला घटनास्थळावरून तलवार घेऊन जाताना ग्रामस्थांनी बघितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं. सध्या आरोपी नशेत असून शुद्धीत आल्यानंतर चौकशी केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.