दोघे सख्खे भाऊ गंभीर जखमी

किरकोळ वादातून राजिवडय़ात दोघा सख्ख्या भावांवर तलवारीने सपासप वार केल्याच्या घटनेचे एकच खळबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात गंभीर दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

जुबेर फकीर मुकादम (४६) आणि तमीम फकीर मुकादम (दोघेही रा. राजिवडा बांध) अशी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. जखमींच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार राजिवडा येथीलच सिकंदर कासम बुडये नामक व्यक्तीने या दोघांवर तलवार हल्ला केला. जुबेर मुकादम यांचा मासेमारी व्यवसाय आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास राजिवडा उर्दू शाळेनजीक ते मासेमारी जाळे तयार करत होते. या वेळी जुबेर मुकादम याच्या घरासमोर राहणारा सिकंदर बुडय़े हा तिथून जात असताना दोघांची नजरानजर झाली. जुबेर मुकादम खुन्नस देत असल्याचा समज करून सिकंदर बुडय़े याने घरात जाऊन तलवार घेऊन जुबेर मुकादम यांच्यावर हल्ला चढवला. सिकंदरने जुबेर याच्या कानावर, मानेवर आणि हातावर तलवारीने जोरदार वार केले. सिकंदरने केलेल्या हल्ल्यात जुबेर गंभीर जखमी झाल्याने त्यांनी आरडाओरडा केला. जुबेर यांचा आवाज ऐकून त्यांचा भाऊ तमीम याने घटनास्थळी जुबेरच्या बचावासाठी धाव घेतली. या वेळी सिकंदर याने तमीम यांच्यावरही तलवारीने हल्ला चढवला. सिकंदरने तमीम यांच्या छातीवर वार केल्याने तमीम गंभीर अवस्थेत जमिनीवर कोसळले. यानंतर मुकादम यांच्या घरातील नातेवाईकांनी दोघांच्या बचावासाठी धाव घेतली. या वेळी सिकंदर याच्या आईने मुकादम परिवारावर दगडफेक केल्याचा आरोप मुकादम यांच्या नातेवाईकांनी केला. तलवार हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जुबेर आणि तमीम या दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.