रत्नागिरी : कोकणच्या गतिमान विकासासाठी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचा निर्धार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील १२ रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण व त्यांना मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने सह्याद्री अतिथीगृह येथून मंगळवारी करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह बांधकामचे अधिकारी व कोकण रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोकणाच्या पर्यटनाचा व्यापक विस्तार होण्यासाठी निश्चितच लाभ होईल. पर्यटकांना, स्थानिक रहिवाशांना या माध्यमातून चागंल्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील. त्याचसोबत कोकणातील पर्यटनवृद्धीलाही यामुळे मोठी चालना मिळेल. पर्यटन व्यवसायाला पूरक निसर्गसौंदर्याने संपन्न कोकणाच्या सर्वागीण प्रगतीसाठी त्याठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास ही काळाची गरज असून, शासनाने कोकण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्याठिकाणी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी स्वतंत्र विकास मंडळ करण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. कोकणाला नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेली असून त्या ठिकाणच्या या साधनसंपत्तीचा, सागरी किनारे यांचा योग्य वापर झाला पाहिजे. कोकण रेल्वे ही कोकण विकासाची जीवनवाहिनी असून तेथील रेल्वे स्थानकांचा कायापालट झाला पाहिजे. कोकणात विमानतळ, रस्ते, रेल्वे स्थानक विकसित करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. समुद्र किनारेदेखील विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. कोकणाच्या विकासासाठी सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या सर्व रेल्वे स्थानकांवर मंत्री, स्थानिक आमदार, माजी आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते त्या-त्या रेल्वे स्थानकातील कामांचे श्रीफळ वाढवण्यात आले.
सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी रेल्वे स्थानकावर श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत या कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थित होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा सुर्वे, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा ऐश्वर्या जठार, बाबू म्हाप, कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र कांबळे, सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, उपविभागीय अधिकारी जनक धोत्रेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुविधायुक्त स्थानकांची निर्मिती
कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वे स्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वे स्थानके आहेत. एकूण ३७ रेल्वे स्थानकांपैकी पर्यटनदृष्टय़ा महत्त्वाचे व सतत प्रवाशांची वर्दळ असणारे १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील वीर, माणगाव व कोलाड, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर व खेड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ व सावंतवाडी या रेल्वे स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. या १२ ठिकाणी कामांसाठी चालू आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात ५६.२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू करण्यात येत आहेत.
रेल्वे स्थानक सुशोभीकरणांतर्गत रेल्वे स्थानकांच्या पोहोच रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, पथदिवे, पेव्हड शोल्डर व आर.सी.सी. गटारे बांधणे, महिला व पुरुष प्रवाशांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची बांधणी करण्याचे काम अंतर्भूत आहे. प्रवाशांसाठी स्थानक परिसरात दुकाने उभारणे, अंतर्गत प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाची व्यवस्था करणे, ऊन-पावसापासून संरक्षणासाठी कायमस्वरूपी छत तयार करण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी सायकल, दुचाकी, चारचाकी, बस व रिक्षासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग व कणकवली रेल्वे स्थानकापर्यंत रस्ते काँक्रीटीकरण
सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग व कणकवली रेल्वे स्थानकापर्यंत रस्ते काँक्रीटीकरण व सुशोभीकरण करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. मंत्रालयातून हा शुभारंभ करण्यात आला. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर माजी आमदार राजन तेली, कुडाळ येथे माजी खासदार नीलेश राणे, कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी भूमिपूजन केले यावेळी मान्यवर उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील १९ रेल्वे स्थानकांपर्यंत रस्ते विकास करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी खर्च करून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आज एकाच वेळी सर्व रेल्वे स्थानकांवर भूमिपूजन करण्यात आले.