परभणी : जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी व पूर यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे जे नुकसान झाले त्याबाबत अर्थसाह्य मंजुरीचा शासन निर्णय आज गुरुवारी (दि. १८) जारी करण्यात आला असून, त्यानुसार परभणी जिल्ह्याला १२८ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तथापि, सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झाले असून, यासंदर्भात मात्र या शासन निर्णयात कोणतेही निर्देश नाहीत.
खरीप हंगामात जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रत्येकच महिन्यात अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन या पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून जे प्रस्ताव दाखल करण्यात आले. त्यानुसार आज परभणीसह सातारा, सांगली या भागातल्या अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासंबंधीचा एक शासन निर्णय जाहीर केला आहे.
परभणी जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांची एकूण संख्या २ लाख ३८ हजार ५३० एवढी असून, एक लाख ५१ हजार २२२ हेक्टर जमीन बाधित झालेली आहे. या शेतकऱ्यांना १२८ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मदतीसाठी मंजूर करण्यात आला आहे. डीबीटी पोर्टलद्वारे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असून, या मदत वितरणासंदर्भात काही निर्देशही घालून देण्यात आले आहेत.
एका हंगामात एकाच वेळेस ही मदत दिली जाणार असून, कोणत्याही बाबतीत मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेण्याचे या शासन निर्णयात नमूद केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारची वसुली बँकांनी या रकमेतून करू नये अथवा अन्य कुठल्याही प्रयोजनासाठी ही रक्कम वळती केली जाऊ नये, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्याचे प्रस्ताव सप्टेंबर महिन्यात पाठवले गेले होते. त्यानुसार हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान प्रचंड असून, या नुकसानीचे सर्वेक्षण, पंचनामे झाल्यानंतर अहवाल कधी सादर होणार आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य कधी मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे.